हिरवळीच्या खतातून समृद्धीकडे......

हिरवळीच्या खतातून समृद्धीकडे......

Published on

वाणगाव, ता. ५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शेतकरी अधिक उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात जमिनीमध्ये दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. सध्या जिल्ह्यात भात रोपे लावणीयोग्य होत आहेत. पोषक वातावरण असल्याने सध्या जिल्ह्यातील शेतकरी लावणीच्या कामांकडे वळला आहे. जिल्ह्यात चिखलणी करून भात रोपांची पुनर्लागवड करण्यात येते. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला जमिनीमध्ये गिरीपुष्प यासारख्या हिरवळीच्या वनस्पतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे अथवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून हे खत तयार होते. पिकांच्या वाढीसाठी, तसेच जमिनीच्या सुपिकतेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावीत, म्हणून विशिष्ट वनस्पतींचा हिरवा पाला जमिनीत गाडला जातो. तो जमिनीत गाडल्यानंतर तो कुजतो आणि त्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये मातीत मिसळतात. जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठरावीक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात. यास हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

हिरवळीच्या वनस्पती
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग आदी पिकांची लागवड केली जाते.

हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती
सर्वसाधारणपणे एक टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते तीन टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी सहा टन हिरवळीचे खत प्रतिहेक्टरी वापरावे लागते.

कोकण कृषी विद्यापीठाने चारसूत्री भातलावणीच्या वेळेला गिरीपुष्प या हिरवळीच्या वनस्पतीचा अवलंब करावा, अशी शिफारस आहे. शेतकऱ्यांनी भातलावणीच्या वेळी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि पाण्याची जलधरण क्षमता वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला भात खाचरात गिरीपुष्प, ताग, धैंचा अशा हिरवळीच्या वनस्पतींच्या पाल्याचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीचे आरोग्य टिकून राहील, तसेच जमिनीला नत्राचा पुरवठा देखील होऊ शकेल.
- राजू तांबोळी, प्रभारी कृषी उपसंचालक, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com