जव्हार पर्यटन बहरले

जव्हार पर्यटन बहरले

Published on

संदीप साळवे, जव्हार
पालघरमधील थंड हवेचे ठिकाण, धाकटी जेजुरी आणि आदिवासी राजवट लाभलेल्या जव्हारचे सौंदर्य पावसाळ्यात अतिशय मनमोहक असते. सोसाट्याचा वारा, दाट धुके पडत गेल्या काही दिवसांपासून पावसाला चांगली सुरुवात झाल्याने येथील वातावरणात प्रचंड गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे पावसाळी सहलीचे बेत होऊन जव्हारला प्रथम पसंती मिळत असल्याने येथील पर्यटन बहरले आहे.

जव्हारच्या वातावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे भन्नाट रानवारा, निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला सुंदर नजराना, खळाळणारे झरे, पाऊस आल्यानंतर धो-धो वाहणारे धबधबे... अन् बरंच काही... निसर्गाचे वरदान लाभलेली भूमी म्हणजे जव्हार होय. या तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. या सृष्टीच्या अकल्पित आनंदाचा मोह आवरता न आल्याने येथे पर्यटकांची आता गर्दी होईल. तथापि, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता स्थानिक प्रशासनाने धबधबे ठिकाणी काही अटी-शर्ती घालत ३० सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.

तालुक्यात धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांची विशेष ओढ असते. पावसात भिजल्यानंतर गरम गरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने, पर्यटकांना आपला आनंद लुटण्यासाठी एक वेगळा वाव या तालुक्यात तयार होऊ लागला आहे. शिवाय जव्हार शहरात निरनिराळ्या प्रकारचे हॉटेल्स, कुटीर आणि वर्षा सहलीचे नियोजन होऊ लागल्याने पर्यटकांना ही एक पर्यटन पर्वणी असून, ही मौज मजा काही औरच असते.

जव्हार पर्यटनात काय पाहाल?
हिरडपाडा धबधबा
जव्हार शहरापासून सुमारे १३ किमी अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून कोसळणारा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नव्हता, मात्र आता समाजमाध्यमांच्या वापराने हे पर्यटनस्थळ निदर्शनास येत आहे. पूर्वी, धबधब्यापर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नव्हती, मात्र यंदा थोडी पायपीट केली, तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो.

काळमांडवी धबधबा
जव्हार शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या केळीचा पाडा या गावातून तीन किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला ‘काळमांडवी’ धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव ‘काळमांडवी’ असे पडले आहे. अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात.

दाभोसा धबधबा
जव्हार तालुक्यापासून १७ किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाभोसा धबधबा. या धबधब्यावर पर्यटकांची झुंबड उडाली असून, अनेक पर्यटक नैसर्गिक धबधब्यावर ठाणे, गुजरात, नाशिक, सिल्व्हासा, वाडा, विक्रमगड या ठिकाणाहून डोंगरदरीतील नैसर्गिक धबधबा पाहायला मिळत आहे. त्याचा आनंद घेताना सुट्टीच्या दिवशी शनिवार, रविवार मोठी गर्दी होताना दिसत आहे.

खडखड धरण
जव्हार शहरापासून साधारण सहा किमी अंतरावर खडखड धरण आहे. मुसळधार पावसामुळे हे धरण दुथडी भरून वाहत असल्याने पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो. सांडग्यावरून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याने ओलेचिंब भिजत पावसाचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक हा स्वतःच्या दुनियेत रममाण होतो.

जयसागर जलाशय
साधारण गेल्या ६० वर्षांपूर्वी जव्हार शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, याकरिता जव्हार संस्थानातील नरेश यशवंतराव मुकणे महाराज यांनी जयसागर जलाशयाची निर्मिती केली. पावसाळ्यात हा परिसर अतिशय नयनरम्य असून, या ठिकाणी येऊन फोटोग्राफी करण्याकरिता पर्यटक प्रथम पसंती देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com