खालापूर पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिर
खालापूर पोलिस ठाण्यात आरोग्य तपासणी शिबिर
खालापूर, ता. ५ (बातमीदार) ः सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश मधुकर कळमकर यांच्या पाचव्या स्मृतिपीत्यर्थ पोलिस कर्मचारी, वन विभाग, तहसील कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन खालापूर पोलिस ठाणे येथे करण्यात आले होते. दिलासा फाउंडेशन खालापूर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील, खालापूर नगर पंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, खोपोली विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा, नगरसेविका शिवानी जंगम, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले, निवृत्त पोलिस अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दिलासा फाउंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक करत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. नगरसेविका शिवानी जंगम यांनी कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेला सहाय्यक फौजदार महेश कळमकर यांच्या आठवणी विविध सामाजिक उपक्रमातून सतत जागवल्या जात असल्याचे सांगितले. स्वर्गीय महेश कळमकर यांच्या समवेत नोकरी केलेले माजी पोलिस अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुमारे ५० जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
................
विद्यार्थ्यांना तत्काळ दाखले देण्याची मागणी
कर्जत (बातमीदार) ः अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात दुबार भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, मेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामही धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच आगरी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले नॉन क्रिमिलिअर दाखले तातडीने मिळावेत, अशी मागणी आगरी समाज संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वसंत कोळंबे, अध्यक्ष संतोष पेरणे, भगवान धुळे, शिवाजी कराळे, भूषण पेमारे, सूर्यकांत चंचे, ॲड. श्रीकृष्ण डुकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पीक पावसामुळे उभेच राहिले असून, काही शेतकऱ्यांची पेरणीही अपयशी ठरली आहे. शासनाने अद्याप कोणतीही मदत केली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. तसेच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत जात व नॉन क्रिमिलिअर दाखल्याशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अडले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाने दाखले जलद गतीने देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.