अभंगवारीत ठाणेकर दंग
अभंगवारीत ठाणेकर दंग
‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ५ ः ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा’, ‘तुकाराम तुकाराम’, ‘एकनाथ नामदेव तुकाराम’, ‘जोहार मायबाप जोहार’च्या सादरीकरणाने अभंगवारीत ठाणेकर दंग झाले. आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित अभंगवारीला ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. संताचे अभंगांना रॉक, फ्युजन आणि जॅझ अशा एका वेगवेगळ्या शैलीत सादरीकरणाने तरुणाईलाही भक्तीत तल्लीन व्हायला लावणाऱ्या अभंग रिपोस्ट ग्रुपने तमाम ठाणेकरांच्या कौतुकाची थाप मिळवली. टीप टॉप प्लाझा हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) पॉवर्ड बाय, जीव्हीएम स्पेसेस (JVM Spaces) हे रिअल इस्टेट पार्टनर होते. डॉ. राजेश मढवी फाउंडेशन व महाराष्ट्र बाजारपेठ यांनी सपोर्टिंग पार्टनर म्हणून सहकार्य केले.
रविवारी (ता. ६) आषाढी एकादशीसाठी अवघ्या पंढरपुरात वारकऱ्यांचा महाकुंभ एकत्र झाला आहे; मात्र ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य झाले नाही, अशा विठूरायाच्या भक्तांना अभंगवारी घडवून आणण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी (ता. ४) अभंगवारी या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टीपटॉप प्लाझा, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. संतांचे अभंग मॉडर्न रूपात सादर करून तरुणाईलाही विठू माउलीच्या गजरात ठेका धरायला लावणाऱ्या अभंग रिपोस्ट बँडच्या प्रतीश म्हस्के, अजय वाव्हळ, विराज आचार्य, पीयूष आचार्य, दुष्यंत देवरुखकर, स्वप्नील तरफे या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महापालिकेचे नगर अभियंते प्रशांत सोनाग्रा, टीपटॉप प्लाझाचे जयदीप शाह, एलआयसीचे सुजित देशपांडे, प्रकाश दिडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खरेतर अभंगांचा कार्यक्रम म्हणजे भजन, कीर्तन अशी संकल्पना रूढ झाली आहे. त्यामुळे आजची पिढी ही या अशा धार्मिक उत्सवापासून लांबच राहणे पसंत करते; पण अभंग रिपोस्ट ग्रुप बँड अभंगांना आधुनिकतेचा साज चढवत समकालीन स्वरूप देत संताचा संदेश मनामनात रुजवण्याचा प्रयत्न कसा करत आहे. याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. या कार्यक्रमाला ज्येष्ठांची उपस्थिती होती; मात्र त्यासोबतच तरुणाईची संख्या लक्षणीय होती.
चंदनाचा टिळा अन् विठू गजराचा ठेका
कपाळी चंदनाचा टिळा, कुणाच्या डोक्यावर गांधी टोपी, कुणाच्या हाती टाळ तर विठू माउलीची छाप असणारे टीशर्ट परिधान केलेले तरुण अशा वातावरणाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह गर्दीने भरून गेले होते. सायंकाळी साडेआठच्या सुमारास सुरू झालेली अभंगवारी रात्री अकरा वाजता ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाने संपली. प्रत्येक अभंगाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वन्स मोअरची मागणी होऊ लागली. अखेरच्या काही अभंगांच्या वेळी प्रेक्षकांनी रंगभूमीसमोर ठेका धरला. यामध्ये एका आजीबाईंनाही फुगडी घालण्याचा मोह आवरला नाही. कधी टाळ्या वाजवून तर कधी हात डोलावून, प्रसंगी उभे राहून अभंगवारीच्या भक्तिसूरांमध्ये प्रेक्षक हरवून गेल्याचे पाहायला मिळाले.
कलाकारांची उपस्थिती
अभंगवारी कार्यक्रमाला मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती. शुभंकर तावडे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रथमेश परब या कलाकारांचा ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी अभंगवारीत उपस्थिती लावून मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद घेतले. तसेच अभंगवारी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ‘सकाळ’ आयोजित अभंगवारीचे सर्वच कलाकारांनी कौतुक केले. तसेच एका अनोख्या भक्तिमय वातावरणात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.
पाश्चात्त्य वाद्यांचा वापर करून आपल्या संतांचे अभंग, शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने ठाण्यात अभंगवारीचे आयोजन करून ठाणेकरांना अनोखी भेट दिली. दिवसभरातील सर्व धावपळ विसरून हरिनामात तल्लीन होण्याची संधी यानिमित्त मिळाली. यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन करायला हवे.
- नरेश म्हस्के, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.