ठाकरेंची मनं जुळली, मतं जुळणार का ?
मनं जुळली, मतं जुळणार का?
संतोष दिवाडकर; सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ५ : मराठीच्या मुद्द्यावरून मागील महिनाभर महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी हिंदीसक्तीविरोधात आवाज उठवला आहे. शनिवारी (ता. ५) हिंदीसक्तीविरोधात राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते रस्त्यावर उतरणार होते; मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदीसक्ती हटवली. त्यामुळे मोर्चा रद्द झाला; मात्र ठाकरे बंधूंनी शनिवारी घेतलेल्या विजयी मेळाव्याला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने हा अनेकांसाठी भावनिक क्षण होता. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी घोषणा या वेळी ठाकरे बंधूंनी केली अन् सभागृहात कार्यकर्त्यांचा आवाज घुमला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्याने एकत्रितपणे निवडणूक लढल्यास याचा फायदा नेमका किती होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांची चांगली ताकद असलेल्या कल्याण-डोंबिवलीत आता चित्र पालटणार, असा विश्वास दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते करीत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक काही महिन्यांवरच येऊ घातली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही शहरांत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. २०१९ व २०२२ नंतर झालेल्या राजकीय भूकंपानंतर भाजपसह शिंदेंची शिवसेना वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले. यात एकमेव मनसेच्या आमदारांचाही पराभव झाला. आता मराठीच्या मुद्द्यावर एकवटलेले ठाकरे बंधू एकत्र लढले, तर कल्याण-डोंबिवलीतील वारे नेमके कोणत्या दिशेला फिरणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनसेची ताकद
कल्याण-डोंबिवलीत सुरुवातीपासूनच शिवसेना व भाजप युतीचे वर्चस्व राहिले आहे. २००६ मनसेच्या स्थापनेनंतर मनसेचीदेखील ताकद आहे. २००९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले दोन आमदार आणि २०१०च्या महापालिका निवडणुकीत तब्बल २६ नगरसेवक निवडून आणले होते. पुढे मोदी लाटेनंतर मनसेला उतरती कळा लागल्याने ही संख्या घटत गेली.
ठाकरे गटाला नवी उमेद
शिवसेनेच्या विभागणीनंतर या दोन्ही शहरांतील नेते आणि कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका या दोन्ही पक्षांनी शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशी लढली. यात शिंदेंची शिवसेना वरचढ असल्याचे सिद्ध झाले. शिंदेंच्या शिवसेनेतून दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याने डोंबिवलीत ठाकरेंच्या सेनेला लढण्यासाठी नवी उमेद मिळाली; तरीही ठाकरेंच्या सेनेला मोठा पराभव पाहावा लागला .
कल्याण-डोंबिवलीत आधीच मनोमिलन :
बहुचर्चित बहुप्रतीक्षित पलावा उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील व ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे एकत्र आल्याचे चित्र काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत पाहायला मिळाले. कल्याणमध्येही दोन्ही पक्षांनी कचरा करवाढीच्या मुद्द्यावर एकजूट दाखवली होती.
पालिकेत ठाकरे विरुद्ध महायुती?
मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष जर महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढले तर कल्याण-डोंबिवलीत ते महायुतीला कडवी झुंज देऊ शकतील. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पक्षीय बलाबल महापालिका क्षेत्रात फारसे मजबूत नाही. अशा परिस्थितीत महायुतीसमोर ठाकरे गटाचा निभाव लागणे अशक्यच मानले जाते; मात्र जर ही निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे अशी झाली तर ती चुरशीची ठरू शकते.
ठाकरेंनी एकत्र निवडणूक लढल्यास त्याचा १०० टक्के फायदा दोन्ही पक्षांना होईल. विधानसभेला आम्ही विरोधात लढलो होतो, परंतु एकत्र आलो तर फरक पडेल. शिंदेंच्या शिवसेनेकडे वरवरचे नेते गेले आहेत, परंतु त्यांच्याकडे तितके कार्यकर्ते नाहीत, जसे आमच्याकडे आहेत.
- प्रकाश भोईर, माजी आमदार, मनसे
कल्याण-डोंबिवलीत मनसेचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे त्यांचाही स्वतःचा मतदारवर्ग येथे आहे. नुकतीच मी विधानसभा निवडणूक लढवली आहे. अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले असतानाही आम्हाला ८४ हजार मते मिळाली. त्यामुळे मनसेसह आमचे वर्चस्व येथे आहे. एकत्र लढलो तर दोघांनाही फायदा होईल.
- सचिन बासरे, शिवसेना ठाकरे गट
शहरात ठाकरेंच्या शिवसेनेत आधीच अंतर्गत गटबाजी आहे. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार लागतो, तसेच या दोन्ही पक्षांना युतीची गरज आहे. एकनाथ शिंदे हे तळागाळात उतरून काम करतात. त्यामुळे ते लोकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे युती झाली तरी शिंदे जे निर्णय घेतील त्याला अनुसरूनच कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी राजकारण असेल.
- अरविंद मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना
कल्याण-डोंबिवलीतील लोकांचा जो कल आहे, त्यात मनसे कुठेही दिसत नाही. त्यांच्याकडे कसलाही जनाधार नाही. शिंदे वेगळे झाल्यामुळे उद्धव ठाकरेंची जी पूर्वी येथे स्थिती होती, ती ३० टक्केच राहिली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवता येणार नाहीत. युती झाली तरी ते आम्हाला टक्कर देऊ शकणार नाहीत.
- नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण जिल्हा अध्यक्ष, भाजप
२०१५ पालिका निवडणुकांचा निकाल
शिवसेना - ५२
भाजपा - ४२
मनसे - ०९
काँग्रेस - ०४
एआयएमआयएम - ०४
राष्ट्रवादी काँग्रेस - ०२
२०२४ विधानसभेतील एकूण मतदान :
भाजप (२ जागा) : २,०५,३३१
शिवसेना (२ जागा) : २,६७,१८४
शिवसेना ठाकरे गट (४ जागा) : २,३९,८४९
मनसे (२ जागा) : ९६,८८२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.