मंदिरांत घुमला विठूनामाचा गजर
सावळे सुंदर रूप मनोहर
मंदिरांत घुमला विठूनामाचा गजर; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर) ः ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय’, ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषात रविवार पहाटे विठूदर्शन सोहळा सुरू झाला. आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूरायाच्या नामजपाने वातावरण भक्तिमय झाले होते.
अलिबाग तालुक्यातील वरसोली गावात प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यातील विविध कोळीवाड्यांतील दिंड्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आल्या होत्या. पहाटेपासूनच भजनांचे सूर कानी पडत होते. मंदिर विश्वस्त व संयोजन समितीच्या वतीने भाविकांसाठी उत्तम नियोजन केले होते. मंदिर परिसरात तात्पुरते शेड उभारले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचाही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यातील मंदिरांमध्ये पहाटे विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा झाल्यावर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिरासमोर तुळशी माळा विकणाऱ्यांची गर्दी होती.
वरसोलीच्या आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरात तीन दिवसांच्या एकादशी सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिरात हर्षल नाईक या दाम्पत्याने विधिवत पूजा केली. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून ६० एसटीच्या बस सोडण्यात आलेल्या असून, परतीसाठी दहा जादा बसचे नियोजन केल्याची माहिती रायगडच्या वाहतूक निरीक्षकांनी दिली.