गावकारभाऱ्यांचे मानधन रखडले
गाव कारभाऱ्यांचे मानधन रखडले
पाच महिन्यांपासून सरपंच व उपसरपंचांना आर्थिक त्रास
जव्हार, ता. ६ (बातमीदार) ः आदिवासी तथा दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यात शासनाच्या योजना व सामाजिक संस्थांचा सहभाग यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर सरपंच-उपसरपंच हे गाव कारभारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपापल्या गावाचा विकास साधत असतात; मात्र मागील पाच महिन्यांपासून जव्हार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच अशा १०० गाव कारभाऱ्यांचे मानधन रखडल्याने ते आर्थिक कोंडीत फसले आहेत.
तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायती व दोन ग्रामदान मंडळे आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत व ग्रामदान मंडळात एक सरपंच आणि एक उपसरपंच असल्याने एकूण १०० गाव कारभाऱ्यांचे फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. शिवाय, ग्रामपंचायत सदस्यांचा १२ महिन्यांचा बैठक भत्ताही प्रलंबित आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील शिपायांनादेखील पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे पाच महिन्यांपासून तालुक्यातील सरपंच व उपसरपंचांचे मानधन रखडले आहे. अल्प मानधनावर गावगाडा चालविणाऱ्या सरपंच व उपसरपंचांना सध्या आर्थिक त्रास होत आहे. शासनाने गावगाडा हाकणाऱ्या गावपुढाऱ्यांचे मानधन लवकर अदा करावे, अशी मागणी सरपंच संघटनेच्या महिला अध्यक्ष तथा खडखड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा घाटाळ यांनी केली आहे.
१३ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना मानधनाच्या वितरणासाठी निधी वितरित केला आहे. असे असूनही जव्हार तालुक्यातील भोंगळ कारभारामुळे सरपंच, उपसरपंच, मानधनापासून वंचित आहेत. सदस्यांचा बैठक भत्ताही ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाला नाही, त्यामुळे सरपंच संघटना आंदोलनाच्या तयारीत असून रखडलेले मानधन अदा करावे.
- एकनाथ दरोडा, अध्यक्ष, सरपंच संघटना
तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मार्चपर्यंतचे मानधन अदा केले आहे; मात्र फेब्रुवारीचे मानधन प्रलंबित राहिले आहे. एप्रिल आणि मे रोजीची मागणी पाठवली आहे, जूनची पाठविणे बाकी आहे.
- डी. एस. चित्ते, गटविकास अधिकारी, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.