भाविकांनी घेतले अंधारातच विठ्ठलाचे दर्शन

भाविकांनी घेतले अंधारातच विठ्ठलाचे दर्शन

Published on

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : आषाढीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असताना, बदलापुरात मात्र विठ्ठलभक्तांची महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चांगलीच निराशा झाली आहे. बदलापूर पूर्वेकडील विठ्ठल मंदिरात आणि संपूर्ण गांधी चौक परिसरात शनिवार (ता. ५) रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे भाविकांना अंधारातच मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागत होते.

बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक परिसरात जुने पारंपरिक विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरात आषाढी आणि कार्तिकीला भक्तांचा महापूर लोटलेला असतो. अगदी पहाटेपासून दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. यंदा आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांचा चांगलाच हिरमोड झालेला पाहायला मिळाला. शनिवारी रात्रीपासून गांधी चौक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मंदिरात अंधार पसरला होता. रात्रीपासून सकाळपर्यंत अधूनमधून पाच ते दहा मिनिटांसाठी वीज यायची. मंदिराची सजावट आणि पूजा अर्चा करताना भाविकांना आणि मंदिर व्यवस्थापन मंडळाला मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात सकाळीही वीज नसल्याने अंधारातच भाविकांना दर्शन घ्यावे लागले. या वेळी विठूरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ लागली होती. महावितरणच्या या कारभारावर भाविकांसह मंदिर व्यवस्थापकांनी नाराजी व्यक्त केली.

१० ते १५ दिवसांपासून या परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. सतत तक्रारी करूनही याकडे कोणाचेच लक्ष नाही. आषाढीनिमित्त शनिवारी तयारी करत होतो; मात्र रात्रीपासून वीज नसल्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. विठूरायाची पूजा, भक्तांचे नियोजन सगळे काही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे बिघडून गेले.
- रामभाऊ शेट्ये, अध्यक्ष,
मंदिर व्यवस्थापन

मनसेकडून भाविकांसाठी प्रसादाचे वाटप
बदलापूर पूर्वेकडील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आषाढीनिमित्त उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या वेळी जवळपास २० किलो खिचडी बनविण्यात आली. मनसेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे, उपशहराध्यक्ष दिलीप पाटील, विभागअध्यक्ष नितेश गोसावी, सिद्धांत रोटे, कैलास उबाळे, इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com