कर्जतकर स्मार्ट मीटरच्या विरोधात
कर्जतकर स्मार्ट मीटरच्या विरोधात
आंदोलन करण्याचा वीज ग्राहक संघर्ष समितीचा इशारा
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः कर्जतकरांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात दंड थोपटले आहेत. कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीची बैठक रविवारी (ता. ६) शनी मंदिर कर्जत येथे पार पडली. या बैठकीत स्मार्ट मीटर बसवण्याच्या महावितरणच्या हालचालींना जोरदार विरोध करण्यात आला. जोपर्यंत ग्राहकांच्या सर्व शंका आणि अडचणींचे समाधान होत नाही, तोपर्यंत कोणत्याही घरावर स्मार्ट मीटर बसवू दिले जाणार नाहीत, असा ठाम निर्णय बैठकीत घेण्यात आला.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये कर्जत तालुक्यात ग्राहक संघर्ष समितीने एक ऐतिहासिक आंदोलन छेडले होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, सर्वसामान्य ग्राहकांनी सलग आठ दिवस लाक्षणिक उपोषण करीत महावितरणला धारेवर धरले होते. त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले; मात्र काही समस्यांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी स्मार्ट मीटरविषयी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांनी सांगितले, की स्मार्ट मीटरद्वारे अवाजवी बिल आकारले जात आहे व ग्राहकांच्या शंका महावितरणने दुर्लक्षित केल्या आहेत. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले, की महावितरणने जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास, जनआंदोलन उभारले जाईल. ग्राहकांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समिती आपली भूमिका स्पष्ट करेल.
..............
चौकट
व्यवस्थेत सकारात्मक बदल
बैठकीत उपस्थित सदस्यांनी मत मांडले, की गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर वीज वितरण व्यवस्थेमध्ये काही सकारात्मक बदल झाले आहेत. कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारली आहे. आता तांत्रिक समस्यांवर लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे. तरी काही भागात महावितरण कर्मचारी कामात दिरंगाई करीत आहेत, असेही मत काहींनी मांडले. समितीने ठरवले आहे, की येत्या १५ दिवसांत तालुक्याच्या प्रत्येक फिडरप्रमाणे समित्या तयार करण्यात येणार आहेत. या समित्या महावितरणच्या कारभारावर नजर ठेवतील. जर पुढील काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर महावितरणच्या विरोधात तालुकाभरात मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
###################
कोट
स्मार्ट मीटर बसवू न देण्याबाबत आम्ही पुढील आठ दिवसांमध्ये अभ्यास करून आणि तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य नियोजन करणार आहोत. गेल्या वर्षभरात आम्ही आंदोलन सुरू केल्यापासून अनेक विजेसंबंधी समस्या सोडवण्यात यश आले आहे; पण अजूनही बऱ्याच तक्रारी प्रलंबित आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या तक्रारी आम्ही गांभीर्याने घेत आहोत आणि दर महिन्याला महावितरणकडे निवेदन देत आहोत. समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जून महिन्यात तब्बल ३० वीज खांब बदलण्यात आले.
- ॲड. कैलास मोरे, कर्जत वीज ग्राहक संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.