तळोजा भागातूने बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीबाबत माहिती देण्याचे आवाहन

तळोजा भागातूने बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीबाबत माहिती देण्याचे आवाहन

Published on

बेपत्ता अल्पवयीन मुलीबाबत माहिती देण्याचे आवाहन
पनवेल, ता. ६ (वार्ताहर) : तळोजा फेज-१मध्ये राहणारी १५ वर्षीय मुलगी गत जानेवारी महिन्यात बेपत्ता झाली आहे. अद्याप तिचा शोध न लागल्याने तिची माहिती देण्याचे आवाहन तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेतील बेपत्ता झालेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तळोजा फेज १, सेक्टर १०मध्ये कुटुंबासह राहण्यास होती. गत २४ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रागावून घरातून निघून गेली आहे. या मुलीच्या अपहरणाबाबत तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्वत्र शोध सुरू केला आहे. अद्याप ती सापडलेली नाही. बेपत्ता झालेल्या या मुलीचा वर्ण गोरा, उंची पाच फूट असून, ती अंगाने सडपातळ आहे. या मुलीचे केस लांब असून, तिचा चेहरा उभट, नाक सरळ आहेत. या मुलीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा पायजमा व ओढणी असून पायात सँडल आहे. या मुलीला हिंदी व उर्दू भाषा बोलता येते. या वर्णनाच्या मुलीबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तळोजा पोलिस ठाण्यात ८६५५३५४११७ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक मीना वऱ्हाडी यांनी केले आहे.
................
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनचे पदग्रहण
नवीन पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्या अध्यक्षपदी नीलेश पोटे यांची वर्णी लागली आहे. तर सचिवपदी हितेश राजपूत २०२५- २६ वर्षाची धुरा सांभाळणार आहेत. रोटरी कम्युनिटी सेंटर नवीन पनवेल येथे झालेल्या समारंभात आमदार प्रशांत ठाकूर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे, डॉ. स्वाती लिखिते यांच्या उपस्थितीत दोघांनीही पदभार स्वीकारला. रोटरी क्लबच्या परंपरेनुसार मागील वर्षाचे अध्यक्ष चारुदत्त भगत व सचिव तुषार तटकरी यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष नीलेश पोटे व सचिव हितेश राजपूत यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले, की रोटरीचे कार्य हे तळागळातील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी होत असते. मीसुद्धा या रोटरीचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. पनवेलच्या विकासाच्या दृष्टीने रोटरीचा सहभाग आजही महत्त्वाचा आहे. माझ्याकडून वेळोवेळी रोटरीला आवश्यक असणारी मदत सुरू असते आणि यापुढेसुद्धा नियमित मदत करीत राहू, असेही त्यांनी सांगितले. तर डिस्‍ट्रिक गव्हर्नर संतोष मराठे म्हणाले, की रोटरीचा विस्तार संपूर्ण जगात वाढत चालला आहे. आज देशभरातून अनेक जण रोटरीचे सदस्य होत असल्याचा मला अभिमान आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात आणि त्यात नावीन्य असते.
............
फुंडे येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
उरण (वार्ताहर) ः रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे येथील आरोग्य केंद्र समिती आणि इनोव्हिसिन नेत्र हॉस्पिटल आणि लेझर सेंटर नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उरणचे राजे वीर वाजेकर यांच्या जयंतीनिमित्त ५ जुलै रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १२४ विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. शिबिरात नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अचूक दृष्टी क्रमांक समजण्यास मदत झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नेत्र तपासणीचे महत्त्व स्पष्ट करीत अशा उपक्रमांची विद्यार्थ्यांसाठी उपयुक्तता सांगितली आणि भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, असे सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com