आदिवासींच्या बुरूड कलेवर अतिक्रमण
सुधाकर वाघ ः सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. ७ ः पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकंती करणाऱ्या आदिवासी समाजाला बुरूड कलेतून बांबूपासून दैनंदिन वापरातील विविध वस्तूंमधून दोन पैसे मिळू लागले होते, परंतु फायबर, पत्रा, प्लॅस्टिक वापरामुळे आता व्यवसायालाच घरघर लागली आहे.
आदिवासी लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात रानमेवा, कंदमुळे, बोरे, जांभळे, आंबे, करवंदे, चिकनचोपडा, भोकरे, बिंदुकल्या, आवळे, आठुरणे, येळे फळे, तर पावसाळ्यामध्ये शेवळे, लोत, चायवाल, कवदरे रानभाज्या, तर मुठे, चिंबोऱ्या, मासे पकडून उदरनिर्वाह करावा लागत आहे. दगड धोंड्यांतून परंपरागत शेती करून नगदी भातपिकांबरोबर मोलमजुरीही करावी लागत आहे. त्यातच मुला बाळांची आजार, शिक्षणासाठी दोन पैसे मिळवण्यासाठी घराच्या सभोवतालचा बांबू तोडून पेठ्या, धान्य पाखडण्यासाठी लागणारी सुपे, मासे पकडण्यासाठी विणलेले कपे, तोंडे, मळकर, तोंडे, सारा, नाडा, भोतटी, झोला, वसू, बुरंदुल, चुलीवरील उतणे, भात, वरई, नाचणी, आंबे पिकवण्यासाठी सातवड, भिंतीऐवजी कुड, भाकरीसाठी दुरडी (टोपली) तयार केले जाते, परंतु काळाच्या ओघात स्टील, पत्रा, फायबर, प्लॅस्टिक वापराने बांबूची सुपे, सातवड, दुरड्या, टोपली कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या परंपरागत रोजगारावर गंडांतर आले आहे.
------------------------------------------
बांबूच्या प्रजाती नामशेष
पूर्वी प्रत्येक आदिवासीच्या अंगणात चालणारा बुरूड व्यवसाय गावातील फक्त दोन चार घरीच शिल्लक राहिला आहे. या टोपल्यांनी धान्य, माती, मुरूम, शेण, वाहण्याची कामे केली जातात. आदिवासींच्या हातातील कलाकुसरीने बनवलेल्या बांबूच्या दुरड्यांना गौरी-गणपती, नागपंचमी, पोळा या सणासुदीला खूप मागणी असते. बुरूडगीरीने घरे तसेच गावांच्या सभोवतालचे बांबू संपल्याने मेस, मान्या ही बांबूची जातच नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे बुरूडगीरीसाठी हजार ते बाराशे रुपये भाडे देऊन दुरवरून बांबू आणावे लागत आहेत.
------------------------------------------
घरबसल्या मिळतो रोजगार
टोकावडे आठवडा बाजारात अनेक टोपल्या विक्रीसाठी येतात. त्या टोपल्या बनविण्यासाठी मेस आणि मान्या जातीचे बांबू असतात. मेस जातीचा बांबू जवळपास ८० ते ९० रुपये, तर मान्या जातीचा बांबू ६० ते ७० रुपये किमतीचा आहे. दिवसाला १० ते १५ लहान टोपल्या करीत असतात. मुरबाड तालुक्यातील टोकावडे बाजारातून जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नगर, नाशिक येथे १०० ते १५० रुपयांना या टोपल्या पाठवल्या जातात. काही व्यापारी ३०० ते ४०० दुरड्या एकदाच घेऊन जातात. त्यामुळे बुरूडगीरीने घरबसल्या रोजगार उपलब्ध होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.