खारघरमधील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात
खारघरमधील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात
वाहनचालकांची गैरसोय; अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली
खारघर, ता. ७ (बातमीदार) : सलग सुरू असलेल्या पावसामुळे खारघर परिसरातील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली असून, वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
पनवेल महापालिका प्रशासनाकडून खारघर वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील चौक, सर्कलचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे, मात्र काही ठिकाणी ही कामे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मेमध्ये तवा हॉटेलकडून उत्सव चौक आणि बँक ऑफ इंडियाकडून बेलपाडा आणि खारघर सेक्टर-१२ कडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने दोन महिन्यांतच डांबर बाजूला होऊन रस्त्यावर खडी पसरल्याचे दिसून येत आहे. खारघरमधील बँक ऑफ इंडियाच्या चौकात नेहमी वर्दळ असते. या चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर सेक्टर-४ मधील हार्मोनी स्कूलकडून मित्र हॉस्पिटल आणि उत्सव चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था सेक्टर-१३ मधील चेरोबा मंदिर सर्कलची झाली आहे. चोहोबाजूने पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच खारघर सेक्टर-१२ मधील गोखले शाळेच्या मागील एफ लाइन हिरा इमारतीकडून शिवमंदिर आणि मिनी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, शिवाय सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलनिस्सारण वाहिन्यांचे खोदकाम केल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांची डागडुजी न केल्याने त्यांची आणखी भर पडत आहे. खारघरमधील शिवाजी चौकातील जगदंबा मंदिरकडून उत्सव सभागृहकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था पांडव मार्ग सर्कलची झाली आहे. खारघर वसाहतमधील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुुरुवात झाली असून, पालिका प्रशासनाने अपघात होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
...................
खारघर परिसरात बँक ऑफ इंडिया सर्कलमध्ये काँक्रीटीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
-संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.