कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

अनाथाश्रमातील मुलांची आरोग्य तपासणी
कल्याण (वार्ताहर) : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ येथील जीवन संवर्धन या अनाथाश्रमात जाणता प्रतिष्ठान संस्थेमार्फत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर झाले. तेथील मुलांसाठी आरोग्य तपासणी व औषधोपचार अशा मेडिकल कॅम्पचे आयोजन केले होते. मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय मदत व औषधोपचार केले. याप्रसंगी जाणता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर ताम्हणकर, महिला अध्यक्ष ललिता मोरे, सचिव राम चौहान, डॉ. शोभा पाटील, स्नेहा अय्यर, रोहित महाले, गणेश टीकम आदी उपस्थित होते. या आश्रमातील मुलांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी आश्रमाचे विश्वस्त नंदन कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
........................
टिटवाळा येथे देवशयनी आषाढी एकादशी
टिटवाळा (वार्ताहर) : शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी आणि मंदिराच्या सुवर्ण शताब्दीमहोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात, पारंपरिक थाटात आणि हजारो भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात मोठ्या उत्साहात पार पडला. पहाटे पाच वाजता काकड आरतीने या विशेष दिनाची सुरुवात झाली. त्यानंतर सहा वाजता श्रींच्या मूर्तींचा महाभिषेक झाला. मंदिर परिसरात पवित्र मंत्रोच्चार आणि वाद्यांच्या गजरात भक्तीचे भारलेले वातावरण अनुभवता आले. श्रींच्या प्रतिमांचे गजर, वाद्यपथक, नारळ व पुष्पवृष्टी आणि हरिनामाचा गजर यांनी टिटवाळानगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली. या सोहळ्यात स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळे, बालगोपाळ आणि विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानंतर मंदिरात दुपारी भजन, वाचन आणि संतचरित्र कथन झाले. त्यानंतर एक वाजता महाप्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याकाळच्या सत्रात महामहोपाध्याय वक्ते यांच्या प्रेरणादायी प्रवचनाने भक्तगण मंत्रमुग्ध झाले. रात्री आठ वाजता श्रींची महाआरती, पालखी परिक्रमा आणि पुष्पवृष्टीने या दिवशीचा भक्तिमय समारोप झाला. या सर्व कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, टिटवाळा यांनी केले. भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी विशेष वेळापत्रक आखण्यात आले होते.
..................
कल्याणमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा
कल्याण (वार्ताहर) : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (ता. ६) आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाने भगवान जगन्नाथाची रथयात्रा आयोजित केली होती. कल्याण पश्चिमेकडील वसंतवेली येथील डी-मार्ट येथून निघालेल्या रथयात्रेत हजारो अनुयायी सहभागी झाले होते. खारघर नवी मुंबई इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष एचजी डॉ. सूरदास प्रभू यांनी पूजा केली अन् आरतीनंतर रथयात्रा सुरू झाली. सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी रथयात्रेत विशेष सहभाग घेतला. वसंतवेली येथील डी-मार्ट येथून निघालेली रथयात्रा दुर्गाडी किल्ल्याजवळील माधव बँक्वेट हॉलमध्ये संपली. रथयात्रेदरम्यान भजन-कीर्तन आणि भगवानांचे नाट्य असे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या दरम्यान, खारघर नवी मुंबई इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष डॉ. सूरदास प्रभू यांनी आध्यात्मिक प्रवचन दिले. ज्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला. या वेळी संस्थेचे अनुयायी जगदीश माधव दास यांच्यासह संस्थेचे शेकडो भाविक उपस्थित होते. शेवटी भगवानांच्या आरतीनंतर लोकांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले.
...................
‘एक झाड आईच्या नावाने’ उपक्रमाला सुरुवात
कल्याण (बातमीदार) : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आला. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे, तसेच स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिने पावसाळा सुरू असेपर्यंत हा उपक्रम सुरू असेल. पर्यावरणाच्या रक्षणार्थ प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एकतरी झाड लावावे, असा या उपक्रमाचा मूळ संकल्प आहे. यानुसार स्वच्छ भारत अभियान कल्याणचे पथक सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व घटकांना सोबत घेत पावसाळा संपेपर्यंत शहरात व अन्य ठिकाणी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात कोळसेवाडी पोलिस ठाण्यातून झाली आहे.
.....................
कल्याण पूर्वेत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
कल्याण (बातमीदार) : महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयामार्फत रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजक तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या ३५ अनधिकृत होर्डिंग व बॅनरवर कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यात सहाय्यक आयुक्तांच्या सूचनेनंतर ७४ होर्डिंग हटविण्यात आले होते. बुधवारी (ता. २) सुरू केलेल्या कारवाईत रस्त्याच्या दुतर्फा असलेले दुभाजकातील २७ बॅनर महापालिकेने काढले आहेत. त्याचबरोबर चौका-चौकातील अनधिकृत आठ होर्डिंगही हटविले आहेत. या कारवाईत संतोषनगर, तिसगाव नाका, आमराई चौक ते विजयनगर रस्ता परिसरात केली. तसेच चक्कीनाका, सूचकनाका, क्रिश बार, हनुमाननगर, पुना लिंक रोड, खडगोळवली, विठ्ठलवाडी अशा भागातील आठ होर्डिंगवरील कारवाई प्रलंबित असल्याचे समजते. सर्व जाहिरात एजन्सी, व्यापारी, दुकानदार, राजकीय पक्ष तसेच बॅनर्स लावणाऱ्यांना सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी आवाहन केले आहे, की जर आपले होर्डिंग अनधिकृतरीत्या उभारलेले असतील किंवा त्याची परवानगी कालबाह्य झाली असेल, तर ती स्वतःहून तत्काळ काढून टाकावीत. तसेच, कालबाह्य होर्डिंगची परवानगी तातडीने महापालिकेकडे अर्ज करून नूतनीकरण करावे; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
..................................
चिकणीपाडा विठ्ठल मंदिरात आरोग्याचे धडे
कल्याण (बातमीदार) : आषाढी एकादशीनिमित्त मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून चिकणीपाडा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकरी दिंड्यांचे स्वागत करीत भाविकांना मोफत आरोग्याचे धडे देण्यात आले. विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आरोग्याची चाचणी करण्यात आली. तसेच त्यांना आरोग्यविषयक तक्रारीनुसार विविध सल्ले चिकित्सकांमार्फत देण्यात आले. चिकणीपाडा परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी होणाऱ्या सप्ताहासह आषाढी एकादशीला मोठा उत्सव भरतो. याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. लहानांपासून थोरांपर्यंत सारेच गर्दी करतात. आसपासच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंडीने परिसराचे वातावरण भक्तिमय होते. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ म्हणत दिवसभरात शेकडो भक्तांची याठिकाणी उपस्थिती लागते. संपूर्ण दिवसभर भजन, कीर्तन, अभंग, हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन जमलेल्या वारकरी, भक्तांची आरोग्य तपासणी केली.
..................
सहयोग सामाजिक संस्थेतर्फे वृक्षारोपण
कल्याण (वार्ताहर) : आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे स्मरण करून सहयोग सामाजिक संस्थेतर्फे २० झाडे लावण्यात आली. झाडांना लोखंडी जाळी लावण्यात आली, तसेच संपूर्ण वर्षभर त्याची देखभाल संस्था करणार आहे. या झाडांमध्ये चिंच, कडुनिंब, वड, पावटा, कांचन, शिसम अशी देशी झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, विशाल पावशे, जगदीश तरे, साईराज ग्रुपचे संतोष सावंत, सर्वात्मका संस्थेचे अध्यक्ष संजय निरभवणे, ज्ञानेश्वर माउली ग्रंथालयाचे तानाजी सहाणे, मुकुंद गायधनी, कालिदास कदम, गणेश पराते, नितीन जावळे, रवि देवळे, सुनील डाळिंबे, स्टडी वेव्हज संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी, संजय देवरे, जीजो जोसेफ, मयूर दुधकर, भारत सटाळे, अभिषेक बने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
.................
‘एक झाड विठूरायासाठी’ अभिनव उपक्रम
कल्याण (वार्ताहर) : मैत्री फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त चिकणीपाडा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसरात ‘एक झाड विठूरायासाठी’ या अभियानांतर्गत २०० तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य शिबिर व पाणीवाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरोग्य शिबिरात १०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका ममता वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर शिबिराला उपस्थित होते. या वेळी आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड, नीलेश शिंदे, संगीता गायकवाड तसेच मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव देसाई, उपाध्यक्ष रूपेश गायकवाड, सचिव अतुलकुमार उपाध्याय, खजिनदार सुशील घाडी व शुभम सिंघ, सुमित शिंदे, जयेश गोसावी, साक्षी मिश्रा, वैष्णवी शर्मा, अंजली वर्मा, कंचन यादव व इतर स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......................
डोंबिवलीत ‘मायबोली साजिरी’
डोंबिवली (बातमीदार) : आषाढी एकादशीनिमित्त मायबोली मराठी मनाचा कॅनव्हास हा विशेष कार्यक्रम डोंबिवलीतील सर्वेश हॉल येथे साजरा करण्यात आला. संस्कृती ही मानवाच्या जीवनशैली, मूल्ये, विश्वास आणि प्रथांचे एकसंघ प्रतिबिंब आहे. कथन, वादन, गायन या अंगाने पुढे जाणारा हा कार्यक्रम होता. मराठी संस्कृती अशा विविध पैलूंनी समृद्ध आहे. भाषा, साहित्य, कला, संगीत, सण, पोशाख, खाद्यपदार्थ, स्थापत्यशास्त्र, शस्त्रास्त्र आदींवर आधारित हा कार्यक्रम होता. आपल्या पिढीबरोबरच आपल्या पुढच्या पिढीला मराठी संस्कृतीची भव्यता जाणवून देणे या भावनेतून ‘माय बोली साजिरी’ हा कार्यक्रम करण्याचा उद्देश मेघना विश्वास यांचा होता. समृद्ध मराठी भाषा आणि संस्कृती यांचा सांगीतिक अभिवाचनात्मक आविष्कार हा या कार्यक्रमाच उद्देश होता. या संजीव धुरी, मानसी गर्गे, समीर सुमन, अंशुमान गद्रे, शशांक पडवळ, वरुण देवरे आदी कलाकार उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुराग गर्गे आणि रंगमंच व्यवस्थापक नीरज रायकर यांनी केले. संकल्पना, आरेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन डॉ. मेघा विश्वास यांनी केले होते.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com