थोडक्‍यात बातम्या रायगड दोन

थोडक्‍यात बातम्या रायगड दोन

Published on

चारिझेन फाउंडेशनतर्फे वह्यावाटप
माणगाव (बातमीदार) ः चारिझेन फाउंडेशनमार्फत रायगड जिल्हा परिषद शाळा वारक, कालवण आदी आदिवासीवाडी येथील शाळांमध्ये वह्यावाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, चारिझेन फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश काळे, राकेश पडवळ, वारक आदिवासीवाडीचे शिक्षक जयेंद्र वाघमारे, कालवणचे शिक्षक, मुख्याध्यापक बाळकृष्ण भायदे आदी सदस्य व पालक उपस्थित होते. या वेळी चारिझेन फाउंडेशनमार्फत शाळांची माहिती घेण्यात आली.
..............
खासदार शरद पवार यांचे पेझारी नाक्यावर स्वागत
पोयनाड (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार शरद पवार यांचे सोमवारी पेझारी नाका येथे भव्य स्वागत करण्यात आले. माजी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि पीएनपी नाट्यगृहाचे उद्‌घाटन या दोन्ही कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार हे अलिबाग दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी पेझारी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड या स्मारकासमोर खासदार शरद पवार यांचे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांची विचारपूस शरद पवार यांनी केली. कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारून पवार अलिबागकडे रवाना झाले. या स्वागताला पेझारी व पोयनाड पंचक्रोशीतील शेकापच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी पेझारी नाक्यावर झेंडे व पताका लावून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
.............
साई शाळेत शैक्षणिक साहित्यवाटप
माणगाव (वार्ताहर) ः ‘शाळेला चाललो आम्ही’ या शैक्षणिक साहित्यवाटप २०२५ अभियान अंतर्गत गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र रायगड शाखा यांच्यामार्फत साईमधील राजिप शाळेत इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी साई ग्रामपंचायतीच्या सरपंच हवाबी राहटवीलकर, ग्रामपंचायत सदस्या रेशमा अधिकारी, गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र रायगड शाखेचे अध्यक्ष आनंद डाकरे, उपाध्यक्ष अनिल काठेकर, कार्याध्यक्ष सुदर्शन किन्होळकर, सचिव तुशांत पवार, जय खेडेकर, मनोज खेडेकर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तेजर महागावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
..............
आगरी समाज संस्थेतर्फे नारंगी येथे वृक्षारोपण
पोयनाड, ता. ७ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे आगरी समाज संस्था अलिबाग व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम नुकताच पार पडला. या वृक्षारोपणासाठी आगरी समाज संस्थेच्या वतीने फणस, आवळा, कोकम, सिताफळ, मावा फळ, लिंबू, स्टार फ्रूट अशा एकूण ५० फळझाडांची रोपे भेट देण्यात आली.
नारंगीचे सरपंच उदय म्हात्रे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या फळ रोपवाटिकेमध्ये आतापर्यंत एकूण १८८ झाडांची लागवड पूर्ण झाली आहे. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आगरी समाज संस्थेने घेतली असून, या फळ रोपवाटिकेतील प्रत्येक झाडाला आधार काठ्या लावण्यात आल्या आहेत. तसेच गुरेढोरे व बकऱ्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी सांगितले. ‘झाडे लावू, निसर्ग वाचवू’ या घोषवाक्याला अनुसरून समाज व पर्यावरण रक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम असून, आगरी समाज संस्था वृक्षारोपणासोबत येथील वृक्षसंगोपनसुद्धा करणार आहे. या कार्यक्रमास उपसरपंच केतन म्हात्रे, आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष सुनील तांबडकर, सचिव प्रभाकर ठाकूर, सह-खजिनदार राजेंद्र पाटील, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, मनोहर पाटील, वैभव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
कपालेश्वर मंदिरात दिंडीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कर्जत (बातमीदार) ः तालुक्यातील विविध शाळांनी आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने विठूरायाच्या दिंडीचे आयोजन केले होते. भगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी गावातील रस्त्यांवरून वारीसारखा अनुभव दिला. शिशू मंदिर कर्जत, शारदा मंदिर, महिला मंडळ तसेच कडाव शिशू मंदिर आणि लेस इंग्लिश मीडियम नेरळ या शाळांनी वेगवेगळ्या भागांमधून पारंपरिक पोशाखात दिंडी काढली. प्रत्येक शाळेने आपल्या परीने भक्तिभावाने दिंडी काढली. विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे, काहींनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांची भूमिका साकारत टाळ-मृदंगासह विठ्ठलाच्या नामस्मरणात दिंडीत सहभागी झाले होते. कर्जत शहरातील कपालेश्वर मंदिर हे या उत्सवाचे केंद्र ठरले. मंदिर देवस्थान समितीने विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची आकर्षक सजावट केली होती. शिशू मंदिर, शारदा मंदिर व महिला मंडळ शाळांच्या विद्यार्थ्यांनी येथे आगमन केल्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनव ज्ञानमंदिर संस्थेच्या शिशू मंदिर, कर्जत या शाळेने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नाम गात दिंडी सादर केली. शाळेपासून कपालेश्वर मंदिरापर्यंत वारीप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली.
.............
मेढेखार येथे मोहरमनिमित्त मिरवणूक
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावात मोहरमनिमित्त ताबूत मिरवणूक नुकतीच पार पडली. मेढेखार गावात मुस्लिम धर्माचे रहिवासी नसले तरी गावातील सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन मोहरम साजरा करतात. मेढेखार गावाचे श्रद्धास्थान पीरबाबा आहेत. यानिमित्त पाचदिवसीय मोहरम उत्सव साजरा केला जातो. या पीरबाबाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. रविवार, ६ जुलै रोजी या पीरबाबाची हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मिरवणूक काढली. पाच दिवस चाललेल्या या उत्सवात अनेक मुस्‍लिम भाविकांनी पीरबाबाचे दर्शन घेतले. पाचव्या दिवशी म्हणजे मोहरमच्या दिवशी पीरबाबाची वाजत-गाजत मेढेखार गावात मिरवणूक काढण्यात आली व मोहरम साजरा करण्यात आला. या पीरबाबाच्या मिरवणुकीदरम्यान मेढेखार गावातील तरुणांनी दाखवलेला सामाजिक संदेश कौतुकाचा विषय ठरत आहे.
...................
रोह्यात पाच हजार ज्यूट पिशव्यांचे वाटप
रोहा (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने माझे नेते, माझा अभिमान या संकल्पनेअंतर्गत प्लॅस्टिकमुक्त रोहा उपक्रमाला चालना देण्यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पाच हजार ज्यूट पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रोहा येथे समीर शेडगे मित्र मंडळाच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मराठा महासंघाचे अध्यक्ष अप्पा देशमुख, माजी सरपंच अनंता देशमुख, तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com