ऐन पावसाळ्यात कचरा प्रश्न गंभीर

ऐन पावसाळ्यात कचरा प्रश्न गंभीर

Published on

ऐन पावसाळ्यात कचराप्रश्न गंभीर
तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : महापालिकेने शहर स्वच्छ सुंदर असावे, यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे; मात्र सध्या कल्याण-डोंबिवली शहराची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. कल्याण पश्चिमेसाठी घंटागाड्याच नाहीत. त्यामुळे इतर प्रभागातील कचरा उचलून झाला, तरच कल्याण पश्चिममधील कचरा उचलला जात आहे. अनेक रहिवासी संकुलात दोन ते तीन दिवस घंटागाड्या फिरकत नसल्याने रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरम्यान, पालिकेच्या पोर्टलवर नागरिकांनी कचऱ्याचे फोटो आणि तक्रारींचा पाऊस पाडला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात कचऱ्याचा चेन्नई पटर्न राबवत शहर स्वच्छ करण्यासाठी वर्षाला ८६ कोटी इतकी रक्कम मोजून पालिका प्रशासनाने मे. एन्को प्लास्ट या कंपनीची नियुक्ती केली आहे. शहरातील सात प्रभागांतील कचरा गोळा करून तो उचलून प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी या कंत्राटदारावर देण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून शहर महिनाभरात स्वच्छ केले जाणार आहे, असा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकांवर ९०० रुपयांचे कचरा संकलन शुल्क थोपले आहे. सुरुवातीला या शुल्काला होणारा विरोध मावळताच प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे; मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेच्या नावाने शहराचा बोजवारा उडालेला आहे.

संबंधित कंत्राटदाराला कचऱ्याचे गणित सुटलेले नाही. ताबा घेऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप सातपैकी एकाच प्रभागात त्याने काम सुरू केले आहे, तर उर्वरित प्रभागात पालिकेचे कर्मचारी कचरा उचलतात. दरम्यान, जुन्या कंत्राटदाराने काम बंद केल्याने पालिकेला घंटागाड्या आणि आरसी गाड्यांचा तुटवडा जाणवत आहे. एका प्रभागातील कचरा उचलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाड्या दुपारच्या सत्रात दुसऱ्या प्रभागातून फिरवल्या जातात. अनेकदा सकाळपासून काम करणारे कर्मचारी दुपारपर्यंत कंटाळतात, यामुळे दुपारच्या सत्रात अनेक भागात वाहने पोहोचतच नसल्याने कल्याण पश्चिमेकडील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

रस्त्यावर दुर्गंधी
कल्याण पश्चिमेकडील ब आणि क प्रभागात जुन्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कचरा उचलला जात होता. आता पालिकेच्या माध्यमातून या भागातील कचरा उचलला जात असला तरी या प्रभागासाठी कचरा उचलणाऱ्या गाड्या नसल्याने या वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. उंबर्डे, वाडेघर, गोदरेज यासारख्या उच्चभ्रू सोसायट्यामधील कचरा मागील तीन दिवसांपासून उचललेला नाही. त्यामुळे सोसायट्याच्या कचराकुंड्या रस्त्यावर मांडून ठेवल्या आहेत. भटक्या श्वानांनी हा कचरा रस्त्यावर पसरवला आहे. पावसामुळे कचरा कुजल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. याच कचऱ्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी शेकडो तक्रारी महापालिकेच्या पोर्टलवर केल्या आहेत.

नागरिकांचा संताप
तक्रारीनंतर संध्याकाळी उशिरा कुंड्यांमधील कचरा उचलून नेण्यात येतो. त्यामुळे रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याचा बकालपणा कायम असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येबाबत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कार्यशाळेला भेट दिली. या वेळी येथे कचऱ्याच्या गाड्या धूळखात उभ्या असल्याचे दिसून आल्या. या वर्कशॉपला भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. गेल्या दोन महिन्यांपासून या वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये झाडे वाढली आहेत. प्रशासनाच्या बेबंदशाहीमुळे नाहक नागरिक भरडले जात आहेत, असा आरोप मोहन उगले यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com