वसईकर न्हाऊन निघाले अभंगांच्या अमृतधारेत
विरार, ता. ७ (बातमीदार) : ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष, ‘रूप सुंदर सावळा गे माये’पासून सुरू झालेला विठ्ठलाची महती सांगणारा विविध संतांच्या रचना असलेल्या भक्तिगीतांचा प्रवास शेवटी पसायदानाने थांबला. या भक्तीच्या वारीतील अभंगांच्या अमृतधारेत रसिक चिंब झाले. एका बाजूला बाहेर कोसळणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला विठूरायाची लागलेली आस यामध्ये वसईकर रसिक तल्लीन झाले होते. निमित्त होते ते आषाढी एकादशीचे. साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, यंगस्टार ट्रस्ट आणि क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ‘आषाढ घन सावळा’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ होते.
वसईच्या गणपतराव क्रीडा मंडळाच्या आप्पा पेठे सभागृहात हा कार्यक्रम रविवारी (ता. ६) आयोजित केला होता. या कार्यक्रमात रसिकांना अनेक संतांच्या अभंगरचना ऐकायला मिळाल्या. सुरुवात झाली ती अनिरुद्ध जोशी यांच्या ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या नामस्मरणाने. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला प्रवास विठ्ठल भेटीचा. या प्रवासात विविध संतांच्या रचना रसिकांच्या भेटीला आल्या. त्यात कधी ‘खेळ मांडीयेला वाळवंटी’, ‘विष्णुमय जग, माझे माहेर’, ‘पंढरी हरी म्हणा कोणी गोविंद, रखुमाई रखुमाई’, ‘विठूमाउली तू माउली जगाची’, ‘माउली माउली रूप तुझे’, ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘केशव माधवा’पर्यंतच्या अनेक रचना रसिकांच्या भेटीला आल्या. शेवटी ‘माउली माउली’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
माजी महापौर नारायण मानकर, डॉ. विजय शिरीषकर, वसई विकास बँकेचे माजी अध्यक्ष जगदीश राऊत, क्रीडा मंडळाचे कृष्णकुमार व उपाध्यक्ष सुरेश ठाकूर, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे, दत्ताराम मणेरीकर, प्रकाश वनमाळी आणि संदेश जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वीरेंद्र पाटील व शिल्पा पै परुळेकर यांनी केले. संदेश जाधव यांनी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला छाया लंच होम, लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटी, डॉ. शिरीषकर चॅरिटेबल ट्रस्ट, देवेंद्र दांडेकर यांचे सहकार्य लाभले.
विठूरायाच्या दर्शनाचा आभास
या कार्यक्रमात ‘सारेगम’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ स्पर्धेचा विजेता अनिरुद्ध जोशी, केतकी भावे जोशी, स्वानंदी केळवेकर, अभिषेक मारोतकर यांनी अभंग सादर करून रसिकांना थेट पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनाला नेले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन योगेश केळवेकर, तर सूत्रसंचालन आरजे अमित काकडे यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले. त्यांनी वारी आणि संतांच्या अनेक आठवणी सांगून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.