ठाकरेंमुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा
भिवंडी, ता.७ (वार्ताहर)ः ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयाचे पडसाद भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार असल्याची चर्चा रंगली असताना संभाव्य युतीचा फायदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटासह मनसेला होण्याची शक्यता आहे.
भिवंडी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत १२ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने सध्या शहरात शिवसेना ठाकरे गटाची पाटी कोरी आहे. तसेच प्रभावी नेतृत्व नसल्याने मतदारांमध्ये प्रभाव पाडू शकत नाही. अशीच काहीसी परिस्थिती शहर मनसेची आहे. मनसेला अजून महापालिकेत शिरकाव करण्यात अपयश आले आहे. पण दोघांच्या एकत्र येण्याचा महापालिका निवडणुकीत त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नसली तरी ग्रामीण भागाचा विचार केल्यास ठाकरे बंधूंना मानणार मोठा वर्ग असल्याने त्याचा प्रभाव जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रकर्षाने दिसणार आहे. भिवंडी ग्रामीण वीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आज ही ग्रामीण भागात शिवसेना ठाकरे पक्षाला मानणार मोठा वर्ग आहे. पण शिंदे गट वेगळा झाल्याने मतांची टक्केवारी घसरली आहे.
-----------------------------------
मतांची आकडेवारी
२०२४ मध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप एकत्रित लढवल्याने त्यांना ५२.६८ टक्के मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाला २८.६८ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ५.७२ टक्के मते मिळाली होती. शांताराम मोरे यांना १ लाख २७ हजार २०५ मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांना ६९ हजार २४३ तर मनसेच्या वनिता कथोरे यांना १३ हजार ८१६ मतांवर समाधान मानावे लागले आहे. या तुलनेत मनसेने २०१४ मध्ये १४.७२ टक्के तर २०१९ मध्ये २२.६० टक्के मते मिळवली होती.
------------------------------------------
भाजपला रोखण्याची ताकद
ठाणे जिल्हा परिषदेमधील ६६ सदस्यांपैकी २१ सदस्य भिवंडी तालुक्यातून निवडून जातात. यामध्ये २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना १०, भाजप ८, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १ असे संख्याबळ होते. एकत्रित शिवसेनेतून निवडून आलेल्या १० पैकी दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. दोन ठाकरे गटात राहिले तर चार सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असले तरी संघटनात्मक बांधणी तसेच मनसेची साथ लाभल्यामुळे भिवंडीतील शिवसेना शिंदे गटासह भाजपला रोखण्यात यशस्वी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.