काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बुजविले खड्डे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. त्यातच ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात घमेले, फावडे घेऊन श्रमदान केले. एवढेच नाहीतर स्वखर्चाने ठिकठिकाणी रस्त्यातील खड्डे बुजवून ‘खड्डे भरो’ आंदोलन केले. दरम्यान, वाहनचालकांकडून एक एक रुपया घेत, हे पैसे घेऊन आतातरी प्रशासनाने खड्डे भरावेत, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
ठाणे शहरातील वंदना डेपो, ठाणे स्थानक, एसटी आगार, घोडबंदर रोड, साकेत, कामगार हॉस्पिटल चौकसह कळवा, मुंब्रा, दिवा, नौपाडा, कोपरी, वागळे, वर्तकनगर, लोकमान्यनगर, माजिवडा मानपाडा, उथळसरसह सर्वच प्रभाग समितीअंतर्गत ‘खड्डे भरो आंदोलन’ केले. त्यामुळे प्रवाशांसह चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या वेळी बोलताना शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यात रस्त्यावर पडणारे खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजवण्यात दिरंगाई केली जाते. खड्डे भरण्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांचे खड्ड्यांमुळे अतोनात हाल होत आहे.