कचरा विघटन यंत्रणा वादात

कचरा विघटन यंत्रणा वादात

Published on

कचरा विघटन यंत्रणा वादात
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : शहरातील कचरा क्षेपणभूमीची क्षमता संपली आहे. त्यामुळे येथील जमा कचऱ्यावर प्रक्रिया व कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, या हेतूने सुरू केलेली कचरा विघटन यंत्रणा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कामात ठेकेदाराने कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचे बिल दिल्याचा आरोप माजी नगरसेवक खान मतलुब सरदार यांनी केला आहे.

भिवंडी शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा शहरातील चाविंद्रा रामनगर येथील क्षेपणभूमीवर टाकला जात आहे. तेथील जागेची कचरा साठवणूक क्षमता संपल्याने भलेमोठे कचऱ्याचे डोंगर या ठिकाणी तयार झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने येथील कचऱ्याचे विघटन करणे, तसेच त्यातील घटक वेगवेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले. यासाठी पालिकेने मेसर्स सुप्रीम गोल्ड इरिगेशन लि. नांदेड या संस्थेला ४११ रुपये प्रतिटनप्रमाणे चार लाख ६२ हजार १७८.१४ टन कचरा वैज्ञानिक पद्धतीने पुनर्भरणासाठी, तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १८ कोटी ९९ लाख ५५ हजार २१५ रुपयांचा ठेका १३ ऑक्टोबर २०२३ रोजी दिला आहे.

ठेकदाराने क्षेपणभूमीमध्ये येणाऱ्या कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने विघटन करणे, जुन्या कचऱ्याच्या जमिनीचे पुनर्भरण करण्याचे उद्दिष्ट होते. यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार जुन्या टाकलेल्या कचऱ्याचे उत्खनन करणे. त्यानंतर जैवप्रक्रियेद्वारे कचऱ्याचे स्थिरीकरण करणे अपेक्षित होते. यामधून निघणारे बारीक तुकडे, विटा, दगड, धातू, प्लॅस्टिक, कपडे, चिंध्या या घटकांची पुनर्प्राप्ती करून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते; मात्र या ठिकाणी कोणतीही यंत्रणा ठेकेदाराने न उभारता कचरा जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला. तसेच त्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचे बिल वसूल केले, असा आरोप माजी नगरसेवक खान मतलुब सरदार यांनी केला आहे.

ठेकेदाराने कोणतीही यंत्रणा न उभारता याठिकाणी खोटे बिल सादर करून एक कोटी रुपयांचे बिल ठेकेदाराने घेतल्याचा आरोप खान मतलुब सरदार यांनी केला आहे. याबाबत सुरुवातीपासून तक्रार केली आहे; मात्र त्याची दखल घेतली नसल्याचे सांगितले.

क्षेपणभूमीत पुन्हा कचरा टाकण्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी कचरा विघटन करणे गरजेचे आहे. त्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या कामावर तेथील स्वच्छता विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून असतात. तसेच याआधी बिल देण्यापूर्वी ठेकेदाराने केलेल्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेण्यात आली होती. सध्या पावसाळ्यात हे काम बंद ठेवण्यात आले आहे.
- विक्रम दराडे, उपायुक्त मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com