बेकायदा इमारतींवर भर पावसात होणार कारवाई
बेकायदा इमारतींवर भरपावसात कारवाई!
अतिक्रमणविरोधी पथकाचा कृती आराखडा तयार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून पावसाळ्यात बेकायदा इमारतींवर कारवाई केली जात नाही. याचा गैरफायदा घेत काही भूमाफियांकडून मोकळ्या जागेवर बांधकाम करण्यात येत असल्याने पुढील आठवड्यात नवी मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने त्याकरिता कृती आराखडा तयार केला असून पोलिस बंदोबस्तातही कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर अनेकदा न्यायालयाने टिप्पणी केली आहे. दिघ्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे नवी मुंबई राज्यभरात प्रकाशझोतात आली असली तरी आजही मोकळ्या जागांवर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. याबाबत अनेक वेळा महापालिकेतर्फे नोटिसा दिल्या जातात; मात्र त्या नोटिसींवर न्यायालयात तारखेवर तारखा पडत असल्याने कारवाईस विलंब होतो. अशा इमारतींमधील सदनिका तत्काळ विक्री करून बांधकाम व्यावसायिक फरार होतात. असे प्रकार पावसाळ्यात अधिक होतात.
पावसाळ्यात महापालिकेकडून कारवाई होत नसल्याचा गैरफायदा घेत शेकडो इमारती या काळात उभ्या राहत आहेत. अतिक्रमण विभागाने अशा इमारतींचा सर्व्हे केला असून ५० पेक्षा जास्त तीन ते चार मजली इमारतींवर हातोडा चालवण्याची तयारी अतिक्रमणविरोधी पथकाने केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शन घेऊन आठवडाभरात महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर थेट कारवाई केली जाणार आहे. पावसाळ्यात अशा प्रकारची पहिल्यांदाच कारवाई होणार आहे. या कारवाईत इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न आहे.
या इमारतींवर पडणार हातोडा
दिवाळे गावात विनापरवानगी चार इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याआधीसुद्धा काही इमारतींवर कारवाई केली होती; मात्र त्यानंतरही काम सुरू असल्याने महापालिकेतर्फे बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. दिवाळे गावातील चार, आग्रोळी गावातील एक, करावे गावात एका इमारतीचे नवीन बांधकाम केले जात आहे. नेरूळ गावातील तीन इमारती रडारवर आहेत. घणसोली, गोठिवली या भागातून प्रत्येकी चार इमारती पाडणार आहेत. ऐरोलीमध्ये दोन बेकायदा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी एक इमारत सिडको आणि एक इमारत महापालिका तोडणार आहे.
कोपरखैरणेतील ओटल्यांवरील बांधकाम रडारवर
कोपरखैरणे परिसरात सिडकोने विक्री केलेले ओटल्यांच्या जागेवर आता चार मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. हे बांधकाम असे केले आहे, की दुसऱ्या इमारतीची भिंतीमध्ये हाताची पाच बोटे जातील, एवढीच जागा शिल्लक आहे. याठिकाणी जास्तीत जास्त एक मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी अनुज्ञेय आहे; मात्र त्याठिकाणी चार मजली बांधकाम केले जात आहे. अशा ठिकाणीही महापालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे. कोपरखैरणे सेक्टर १५, १६, १९, २० आणि पाचमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत.
पावसाळ्यात महापालिकेतर्फे कायदा व सुव्यवस्था तसेच इतर बाबींचा विचार करून कारवाई संथ होते; परंतु त्याचा इतर घटकांकडून गैरफायदा घेतला जातो. अशा बेकायदा बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.
- डॉ. कैलास गायकवाड, उपायुक्त, अतिक्रमणविरोधी पथक
बेकायदा इमारतींमध्ये उद्वाहन कसे?
दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, बेलापूर, नेरूळ आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. या इमारतींमध्ये उद्वाहन बसवल्याचे निदर्शनास येत आहे. उद्वाहन असल्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना इमारत अधिकृत असल्याचे भासवले जाते; मात्र एखाद्या इमारतीमध्ये उद्वाहन बसवायचे असेल, तर त्याकरिता बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र लागते. तरीसुद्धा बेकायदा इमारतींमध्ये उद्वाहन लावल्याचे दिसून येत आहे. अशा उद्वाहन कंपन्यांविरोधात महापालिका संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.