संशयास्‍पद बोटीमुळे खळबळ

संशयास्‍पद बोटीमुळे खळबळ

Published on

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर संशयित बोट आल्‍याची माहिती रविवारी रेवदंडा पोलिसांना मिळाली. त्‍यांनी रात्री साडेआठच्या सुमारास कोर्लईतील सरपंचांकडे याबाबत विचारणा करतान ग्रामस्थांनी कोर्लई किनाऱ्यावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे सुरक्षा यंत्रणांनीही कसून तपास केला; मात्र बोटीचा सुगावा न लागल्‍याने अलिबाग, मुरूड समुद्रकिनाऱ्यावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. संशयित बोटीबद्दल सुरक्षा यंत्रणा गुप्तता पाळत असून, किनाऱ्यालगतच्या ग्रामस्‍थांकडे याबाबत चौकशीही करण्यात येत आहे. ‍या घटनेमुळे सागरी सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पावसाळ्यात सागरी मासेमारी बंद असते. त्याचबरोबर नौकांद्वारे होणारी टेहळणी करता येत नाही. भरसमुद्रात काय चालले आहे, याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळत नाही. याचा गैरफायदा घेत अमली पदार्थ्यांची तस्करी होत असल्याचा संशय आहे. दोन वर्षांपूर्वी अमली पदार्थांची हजारो पाकिटे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळली होती. त्यापूर्वी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर सप्टेंबर २०२२ मध्ये भरकटून आलेल्‍या एका बोटीत शस्‍त्रास्‍त्रे सापडली होती. अशा घटना पावसाळ्यात सातत्याने होत असताना रविवारी संशयास्पद बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली. ही बोट भारतीय रडारच्या टप्प्यात आल्यावर सुरक्षा यंत्रणांना संशय आला. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल, नौदल, बॉम्ब निकामी पथक, क्यूआरटी फोर्स, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सीमा शुल्क व स्थानिक पोलिस घटनास्थळी रात्री दाखल झाले. वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे बोटीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे तटरक्षक दल आणि नौदलाकडून विशेष बोटी आणि उपकरणांचा वापर करून शोधमोहीम राबवण्यात आली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम व्यापक करण्यात आली आहे.

कोर्लई किल्ल्यासमोर दोन सागरी मैलावर एक बोट संशयास्पद स्थितीत असल्याचा फोन रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेवदंडा पोलिसांकडून आला. त्यानंतर तटरक्षक दल, पोलिस अधिकारी यांनीही या भागाची सकाळपर्यंत पाहणी केली, परंतु बोट आढळली नाही. या ठिकाणी पोलिस बंदोबस्‍त वाढवण्यात आला असून, शोधमोहिमेबाबत माहिती दिली जात नसल्‍याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे.
- राजश्री मिसाळ, माजी सदस्‍य, जिल्‍हा परिषद, कोर्लई


नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
संशयित बोट पाकिस्तानमधून आल्याचे काही स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे, तर बोटीत संशयास्पद हालचाली आढळल्‍याचे काही सांगतात. सध्या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्‍याने स्‍थानिकांमध्ये संभ्रम आहे. संशयास्‍पद बोटीमागे दहशतवादी कारवाया किंवा गुप्त हालचाली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्‍या आहेत. नागरिकांनी शांतता राखत कुठलीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सुरक्षा यंत्रणांसह स्‍थानिकांना सतर्क राहण्याचे सूचना केल्‍या आहेत. किनारपट्टीवरील गावांमध्ये तीव्र प्रतिसाद गट, पोलिस पाटील, सागरी सुरक्षा रक्षक यांनी गावातील तरुणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी जास्तीत जास्त गस्त घालावी तसेच समुद्रकिनारी कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्ती अथवा वस्तू आढळल्‍यास तत्काळ पोलिस ठाण्याला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दलाच्या पथकाने बंदरे, मच्छी उतरवण्याची ठिकाणे येथे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्‍या आहेत.

पाच संशयितांची चौकशी

संशयास्‍पद बोटीतून उतरून काही व्यक्ती सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत निसटल्याची अफवा कोर्लईत वेगाने पसरली. त्यानंतर रेवदंड्यातून अलिबागकडे पायी चालत जाणाऱ्या पाच जणांना नागाव येथे थांबवून चौकशी करण्यात आली. चौकशीत फारसे काही आढळून आले नाही. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी अलिबाग पोलिस नेण्यात आले.

अलिबाग ः मेरिटाइम बोर्ड, तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीचा शोध घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com