मुस्लिम मतांसाठी कसरत

मुस्लिम मतांसाठी कसरत

Published on

विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः राज्य सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरुद्ध ठाम ठाकरे बंधूंच्या भूमिकेचे मुस्लिम समाजाने स्वागत केले आहे; मात्र राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजूनही समाजातून विरोधाचा सूर आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते मिळण्यासाठी दोघांनाही सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागेल, अशी चर्चा मुंबईकरांमध्ये रंगली आहे.
मुंबईतील मुस्लिम मतदार हा निवडणुकीत नेहमीच निर्णायक भूमिकेत राहिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला होता. भाजपने व्होट जिहादवरून उद्धव ठाकरेंना घेरले होते. आता मुंबई महापालिका निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ठाकरेंना याच मुद्द्यावरून लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन भावांचे महापालिका निवडणुकीत एकत्र येणे महत्त्वाचे आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दोन भावांनी एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. विविध समाज घटकांनीही त्यांचे स्वागत केले आहे.
-------------------------------------
समावेशक भूमिकेची गरज
- समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात विभागला आहे; मात्र एमआयएमपासून हा समाज दुरावत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला संधी असल्याचे बोलले जात आहे.
- मुस्लिम समाजातही ठाकरे बंधू एकत्र आल्याने संमिश्र भावना आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाविषयी त्यांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केल्यामुळे हा समाज त्यांच्या विरोधात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येऊनही राज यांना समाजाचा विरोध राहण्याची शक्यता आहे.
-------------------------------------
राज आणि उद्धव हे दोघे भाऊ एकत्र आले, त्याचा आनंद सगळ्यांनाच झाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा नक्कीच परिणाम होईल. हे दहा वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते; मात्र दोन्ही भावांनी सर्वसमावेशक भूमिका घेतल्यास मुस्लिम समाजाची मते फिरू शकतात, अशी चर्चा आहे.
- फरिद शेख, अमन कमिटी
------------
मुंबईचे सौंदर्यीकरण, शहर आणि उपनगरातील पार्किंग, शौचालयांच्या देखभालीच्या कामांसाठीची निविदा निघते. त्यात मराठी माणूस कुठे आहे. सर्व गुजरातला जात आहे. त्यावर पालिकेचे निर्बंध कुठे आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे काय करणार आहेत?
- सुएब खतिब, विश्वस्त, जामा मशिद
-------------
मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतांवर दोन भावांच्या एकत्र येण्याने परिणाम होईल. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपकडेही मते विभागली जातील. मुस्लिम समाज राज ठाकरेंवर नाराज आहे. त्याचा काही प्रमाणात फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो.
- सईद खान, निवृत्त प्राध्यापक
----------------
राज आणि उद्धव हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे मुस्लिम समाजासाठी आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मुस्लिम समाज उभा राहिला होता. पालिका निवडणुकीतही सहानुभूती उद्धव ठाकरे यांना असल्याची दिसते.
- जमाल संजर, ज्येष्ठ पत्रकार
-------------
लोकसभेचा मतदार कायम राहणार काय?
अणुशक्तिनगर हा विभाग मुस्लिमबहुल आहे. या भागात लोकसभा निवडणुकीसाठी अनिल देसाई यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली. त्याला मुस्लिम समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मुंबईत मुस्लिमबहुल मतदारसंघातही असाच प्रतिसाद मिळाला होता. हा मतदार महापालिका निवडणुकीत पुन्हा शिवसेनेकडे वळेल काय, हा याबाबत सध्यातरी साशंकता आहे.
--------------
५० मतदारसंघांत प्रभाव
मुंबईत चांदिवली, भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तिनगर, शिवाजीनगर, गोवंडी, वांद्रे, जोगेश्वरी, भेंडीबाजार, डोंगरी आदी मुस्लिमबहुल भागात पालिकेचे ५० मतदारसंघांत मुस्लिमांचा प्रभाव आहे.
------------
- मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या - २० टक्के
- विधानसभा मतदारसंघात दहा जागा अशा आहेत, जिथे २५ टक्क्यांहून अधिक संख्येने मुस्लिम आहेत.
-----------
लोकसभा मतदारसंघनिहाय मुस्लिम मतदार
विभाग संख्या (हजारांत)
दक्षिण मुंबई - ३ लाख २५ हजार
दक्षिण मध्य - २ लाख ७४ हजार
उत्तर मुंबई - १ लाख ४४ हजार
उत्तर मध्य - ४ लाख १७ हजार
उत्तर पश्चिम - ३ लाख ५९ हजार
ईशान्य मुंबई - २ लाख ४७ हजार
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com