धावत्या स्कूल व्हॅनच्या डीक्कीतून विद्यार्थी पडले, व्हॅन चालकांचा प्रताप !!!
स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले
दोन जण जखमी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ७) सकाळी घडली. यामध्ये दोन विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत व्हॅनचालकाला ताब्यात घेतले; मात्र या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथ तालुक्यात खासगी व्हॅन्समधून अवैधरीत्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. शहरातल्या अनेक शाळांमध्ये खुलेआमपणे हा प्रकार सुरू असून एका व्हॅनमध्ये १८ ते २० विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून नेले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यातच सोमवारी एका नामांकित खासगी शाळेचे दोन विद्यार्थी भरधाव व्हॅनच्या डिक्कीतून पडल्याची घटना घडली. ही घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून हा वाहनचालक विरुद्ध दिशेने व भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. सकाळी शाळा सुटल्यानंतर स्कूल वाहनचालकाने आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांना व्हॅनमध्ये कोंबल्याने या व्हॅनची डिक्की उघडली आणि हे विद्यार्थी रस्त्यावर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिकांनी धाव घेत या जखमी बालकांना खासगी रुग्णालयात दाखल केले व वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जूनमध्ये ही अशाच प्रकारे वाहनचालकांच्या बेजबाबदारीमुळे आठ ते दहा विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतरही संतप्त पालकांनी शाळा प्रशासन व वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
मी रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी जात असताना त्याच रस्त्यावरून ही स्कूल व्हॅन विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने येत होती. या वेळी व्हॅनची डिक्की उघडली आणि त्यातून दोन विद्यार्थी खाली पडले; मात्र तरीही हा वाहनचालक सुसाट पुढे निघून गेला. या वेळी नागरिकांनी त्याला पकडले, तर मी मुलांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकाला डोक्याला आणि दुसऱ्याच्या हाता-पायाला मार लागला. गाडीमध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी असून हे विद्यार्थी गाडीच्या डिक्कीत बसले होते.
- प्रकाश राम ठाकूर, रिक्षाचालक, प्रत्यक्षदर्शी
स्कूल व्हॅनमध्ये दहा ते बारा लहान विद्यार्थी तसेच दोन महिला असतानाही विद्यार्थी पडल्याने मुलांची सुरक्षितता आहे कुठे, अशा बेजबाबदार वाहनचालक आणि शाळा प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत मुले घरी सुरक्षितरीत्या पोहोचत नाहीत तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी ही शाळा प्रशासनाचीच जबाबदारी आहे.
- प्रमोद निकम, समाजसेवक
वाहनांमध्ये मुलांना जनावरांसारखे कोंबून भरू नये. ही शाळेचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे या वाहनचालकांवर शाळेने कारवाई करावी. तसेच एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन दखल घेणार का?
- अरबाज कुरेशी, स्थानिक नागरिक
नोट : सोबत फोटो जोडलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.