बदल घडविण्यासाठी एकत्र यायला हवे

बदल घडविण्यासाठी एकत्र यायला हवे

Published on

अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : सध्या राज्‍याची स्थिती पाहता, बदल घडविण्याची नितांत गरज आहे. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन निर्माण झाला आहे. मात्र आताचे समाजकारण व राजकारण पूर्णतः दूषित झाले आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल, तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी भाई जयंत पाटील सातत्याने झटत आहेत. त्यांना साथ देण्याची आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्‍याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी केले.
शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग शहरातील पीएनपी नाट्यगृहाच्या नूतनीकरण उद्‌घाटन सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार नीलेश लंके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार बाळाराम पाटील, सरखेल कानेजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे आदी उपस्थित होते. शेकापच्या वतीने मानपत्र देऊन माजी आमदार जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
खासदार शरद पवार म्हणाले की, रायगड जिल्‍ह्याला मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या जिल्ह्याने नेक गायक, कलाकार, शाहीर दिले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ हे नाट्यगृह असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीला नक्कीच फायदा होईल, रायगड जिल्हा हा सहकारी बॅंकांच्या प्रगतीमध्येही अव्वल असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
आपले सर्वांचे जीवन फिरते रंगमंच आहे. माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडून आम्ही सर्वच काही ना काही शिकत आलो आहोत. त्यांच्या अनुभवाचा व विचारांचा वारसा आणि मार्गदर्शन घेउनच वाटचाल करीत असल्‍याचे विचार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्‍त केले.

माणूसपण जपणारे भाई
एकाच माणसाने दहा पावले चालत पुढे जाण्यापेक्षा दहा जणांनी एक एक पाऊल टाकत पुढे गेले तर समाजाचे कल्याणच होणार आहे. भाई जयंत पाटील हे असेच असून माणूसपण जपणारे असल्‍याचे उद्‌गार ठाकरे गटाच्या नेत्‍या सुषमा अंधारे यांनी काढले.

सभागृहात झगडणारा नेता
माझ्या राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण पीएनपी नाट्यगृहात केले. जयंत पाटील यांच्यामुळे ही संधी मिळाली. त्यांच्यासारखा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारा नेता सभागृहात असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी माजी आमदार जयंत पाटील यांना पुन्हा सभागृहात पाठविण्यासाठी प्रयत्न करू, असे विचार सांगोल्‍याचे आमदार बाबसाहेब देशमुख यांनी व्यक्‍त केले. अपयशातून पुन्हा भरारी घेणारे नेता म्‍हणून भाई परिचित असल्‍याचे उद्‌गार खासदार नीलेश लंके यांनी व्यक्‍त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com