वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या पदे वाढणार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जाहीर केली प्राध्यापक पात्रतेची नियमावली
वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांची पदे वाढणार
२२० खाटांच्या शासकीय रुग्णालयांना महाविद्यालयांचा दर्जा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षणक्षमता वाढवण्यासोबतच प्राध्यापकांची अधिकाधिक पदे उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) ‘वैद्यकीय संस्था (प्राध्यापकांची पात्रता) नियमावली २०२५’ जाहीर केली. त्यानुसार, प्राध्यापकांच्या पात्रता निकषांमध्ये बदल केला असून, देशात २२० हून अधिक खाटा असलेल्या शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांची पदेही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत.
नव्या नियमावलीनुसार, १० वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ सहयोगी प्राध्यापक, दोन वर्षांचा अनुभव असलेले सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमले जातील. त्यासाठी वरिष्ठ निवासीपदाचा अनुभव बंधनकारक नसला तरी बायोमेडिकल रिसर्चचा बेसिक कोर्स दोन वर्षांच्या आत पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थांमध्ये तीन वर्षांचा अध्यापन अनुभव असलेले वरिष्ठ कन्सल्टंट प्राध्यापकपदासाठी पात्र असतील. शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये संबंधित विभागात विशेष किंवा वैद्यकीय अधिकारी म्हणून सहा वर्षांचा अनुभव असलेल्या डिप्लोमाधारक सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्र ठरतील. तसेच एनएमसी, विद्यापीठ आणि राज्य वैद्यकीय परिषद किंवा वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन संस्थांमध्ये मिळालेला एकूण पाच वर्षांपर्यंतचा अनुभव ही अध्यापन अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाईल.
दरम्यान, केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर येत्या पाच वर्षांत वैद्यकीय प्रवेशाच्या तब्बल ७६ हजार जागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होईल, असे मत जे. जे. शासकीय रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.
--
पदवीसह पदव्युत्तरचे अभ्यासक्रम
- नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आता एकाच वेळी एमबीबीएसची पदवी आणि एमडी, एमएसचे पदव्युत्तर अभ्यासक्रम एकाच वेळी सुरू करता येतील.
- पदवी अभ्यासक्रम हे फक्त दोन प्राध्यापक व दोन जागांसह सुरू करता येतील. पूर्वी किमान तीन प्राध्यापक व एक वरिष्ठ निवासी आवश्यक होता. तसेच अनेक विषयांमध्ये युनिटप्रमाणे लागणाऱ्या खाटांच्या संख्येतही सुधारणा करण्यात आली आहे.
--
एमएस्सी-पीएचडीधारकांनाही संधी
अॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, बायोकेमिस्ट्री यांच्याबरोबरच मायक्रोबायोलॉजी आणि फार्माकोलॉजी विभागातही एमएस्सी-पीएचडी पात्रता असलेले प्राध्यापक नेमता येतील. तसेच नवीन नियमावलीत वरिष्ठ निवासीपदासाठी वयोमर्यादा ५० वयापर्यंत वाढवली असून यात अॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन आणि कम्युनिटी मेडिसिन यांचा समावेश आहे. यासोबत वैद्यकीयचे ज्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असेल आणि त्याचदरम्यान शिक्षक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे, त्यांचा अनुभव सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी ग्राह्य धरला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.