मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार
मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला गती
म्हाडा आणि अदाणी समूहामध्ये प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळणार आहे. तब्बल १४२ एकरात पसरलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा आणि बांधकाम आणि विकास संस्था म्हणून नियुक्ती केलेल्या अदाणी समूह यांच्यामध्ये आज करार करण्यात आला. त्यानुसार पुढील सात वर्षात हा पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना १६०० चौरस फुटाच्या अत्याधुनिक सदनिका मिळणार आहे.
मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अमंलबजाणीबाबत म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कराराप्रसंगी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अदाणी प्रॉपर्टीजचे संचालक प्रणव अदाणी उपस्थित होते. मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी जे स्वप्न अनेक वर्षे उराशी बाळगले, त्याची मूर्त रुपरेषा आता प्रत्यक्षात येत आहे. देशातील सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प या माध्यमातून राबविण्याचे व म्हाडा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपून पुढे जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तसेच पुनर्विकासाचे स्वप्न आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणार असून प्रत्येकाला अत्याधुनिक, सुरक्षित व सुसज्ज घरे प्रदान करण्याच्या दिशेने म्हाडाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.
----
३.९७ लाख चौरस मीटरचे बांधीव क्षेत्र
१४२ एकर जागेवरील मोतीलाल नगरची व्याप्ती लक्षात घेता कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट पद्धतीने राबविण्यात येणारा देशातील पुनर्विकासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून म्हाडाला ३.९७ लाख चौरस मीटर क्षेत्र विकसकाकडून बांधून मिळणार आहे. या माध्यमातून नजीकच्या भविष्यात ‘म्हाडा’कडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होणार आहे.
---
३७०० रहिवाशांचे पुनर्वसन
मोतीलाल नगर १, २ व ३ मध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे ५.८४ लाख चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अनिवासी गाळेधारकांना ९८७ चौरस फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत.
---
१५ मिनिटांचे शहर संकल्पना
या प्रकल्पातील घरांपासून कार्यालय, सार्वजनिक परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, उद्यान, मनोरंजन ठिकाण, शाळा, हॉस्पिटल १५ मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान हे या प्रकल्पातील वैशिष्ट्य आहे. तसेच या प्रकल्पातील पुनर्वसन निवासी सदनिकांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसविले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.