ती पाकिस्तानी बोट नव्हे तर मासेमारीचा बोटा
‘ती’ पाकिस्तानी बोट नव्हे तर मासेमारीचा बोया
जिल्ह्यातील नाकाबंदी सुरूच; कोकण किनारपट्टीवर अलर्ट
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रात संशयास्पद पाकिस्तानी बोटीबाबतचा संभ्रम दूर झाला असून ती पाकिस्तानी बोट नसून मासेमारीसाठी लावलेला बोया असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. एमएमएसआय- ४६३८००४११ क्रमांक असलेला ‘मुकदर बोया-९९’ या प्रकारच्या या बोयाचा वापर पाकिस्तानमध्ये केला जातो. मासेमारी जाळे वाहून जाऊ नये, म्हणून त्याच्यावर जीपीएस यंत्रणा लावलेली होती. या बोयाच्या माध्यमातून काही घातपात होऊ नये, म्हणून त्याचा शोध घेण्याच्या सूचना भारतीय तटरक्षक दल-दिल्ली यांच्याकडून आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येत ही शोधमोहीम राबवली होती.
पाकिस्तानी बोटीच्या चर्चेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. यानिमित्ताने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्याचे पाहायला मिळाले. रायगड पोलिसांनी याबाबत अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करून या संशयित बोटीबाबतचा संभ्रम दूर केला. हा बोया समुद्रातून वाहून आला असल्याचे रायगड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीदेखील ३ जानेवारीला अशा प्रकारचा बोया ओखा गुजरात येथे आढळून आला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. रविवारी (ता. ६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भारतीय तटरक्षक दल मुरूड यांच्याकडून रायगड जिल्हा पोलिस कार्यक्षेत्रामधील कोर्लई किल्ला येथे साधारणतः अडीच ते तीन नॉटिकल मैल समुद्रात ‘मुकदर बोया-९९’ नावाची संशयास्पद वस्तू दिसून आली. समुद्रात तरंगत असलेल्या या संशयास्पदस्थिती तरंगणाऱ्या या बोयावर एमएमएसआय- ४६३८००४११ असा क्रमांक लिहिलेला आहे, अशी माहिती भारतीय तटरक्षक सुरक्षा दल, दिल्ली यांच्याकडून मिळाली होती. हा प्रकार हा अतिसंवेदनशील प्रकारचा अलर्ट असल्याने रायगड जिल्हा पोलिसांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक अंचल दलाल यांनी सांगितले, की ‘ही माहिती प्राप्त होताच रायगड पोलिस दलाने अलर्ट होत मिळालेल्या अक्षांश व रेखांशनुसार तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. ही मोहीम आज सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंत सुरू होती.’
----
१९ ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत तसेच सागरी व खाडीकिनारी भागात असे एकूण १९ ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी नेमण्यात आली. नाकाबंदीदरम्यान संशयित वाहने व व्यक्तीची कसून तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून संपूर्ण जिल्ह्यात हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस् यांची तपासणी करण्यात आली. याप्रमाणे उपाययोजना राबविण्यात आल्या असून रायगड जिल्हा पोलिस दलातील ५२ अधिकारी व ५५४ पोलिस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.