पनवेल प्लॅस्टिकच्या विळख्यात
पनवेल प्लॅस्टिकच्या विळख्यात
बंदीनंतरही नागरिकांकडून सर्रास वापर; वापरा आणि फेकाची सवय
पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः संपूर्ण राज्यात शासनाने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली आहे. तसेच पनवेल महापालिकेने विविध मोहीम, उपक्रम राबवून प्लॅस्टिक बंदीविरोधात रान उठवले आहे; मात्र तरीदेखील शहरात पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. वापरा आणि फेका या संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दुसरीकडे प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसून येत नसल्याने सर्वत्र संबंधित कचरा पसरला आहे. यासाठी पालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशवी विक्री व वापरावरील कारवाईमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे पर्यावरणवाद्यांकडून सांगण्यात येत आहे.
प्लॅस्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली; परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने त्याच्या वापरावर नियंत्रण आलेले नाही. शासनाने १ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लॅस्टिक बंदी केली आहे. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांनाही बंदी आहे; मात्र सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे. वजनाने हलक्या असल्याने प्लॅस्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जाऊन पाणीसाठे, जंगल आणि जमिनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या पिशव्या गिळतात. त्यामुळे आतड्यात प्लॅस्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लॅस्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लॅस्टिकमधील पॉलिमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दूषित करतात, हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक बाब आहे. त्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
.................
चौकट
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात अनेक दुकानांत, हॉटेलात विशेष करून भाजी बाजारात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर होत आहे. एवढेच नाही तर शहरातील काही दुकानातून त्याची विक्रीही होत आहे. असे असताना त्याचा वापर करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे विक्रेते शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून अशा प्लॅस्टिकची विक्री करीत असून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
चौकट
शहरातील नाल्यांत प्लॅस्टिकचा कचरा
शहरात खुलेआम विकले जात असलेले प्लॅस्टिक इतरत्र फेकले जात असल्याने ते पावसाच्या पाण्याने वाहून नाल्यात गेल्याचे दिसून आले. या प्लॅस्टिकमुळे शहरातील अनेक छोटे नाले बंद झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.