घोडबंदर रुंदीकरणाचे नियोजन फसले
रुंदीकरणाचे नियोजन फसले
घोडबंदरची कोंडी फुटेना; व्यापारी, रहिवासी, चालक त्रस्त
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : नवीन ठाणे म्हणून उदयाला आलेला घोडबंदर परिसर आता वाहतूक कोंडीचा भाग म्हणून ओळखला जात आहे. जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या या मार्गाचे रुंदीकरण करताना नियोजनात हलगर्जी झाली आहे. त्यामुळे तो आता परिसरातील नागरिक आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी तापदायक ठरू लागला आहे. मार्गावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेतच, परंतु भरलेल्या खड्ड्यांच्या जागेवर झालेले उंचवटे आणि सिमेंट काँक्रीटचा आणि जुन्या डांबरी रस्त्याच्या मध्यभागात निर्माण झालेला गॅप अपघाताचे कारण ठरत आहे. या मार्गावरून एकाचवेळी दुचाकी चालवणाऱ्यांना ही संकटे पार करत पुढे जावे लागत आहे. त्यात अनेकांचे जीव गेले आहेत.
ठाण्याच्या खाडीवर असलेल्या भारतातील सगळ्यात मोठ्या कंटेनर बंदरामधून घोडबंदरमार्गे गुजरात, पालघर, वसई भागात रोज हजारोंच्या संख्येने मालाच्या कंटेनरची वाहतूक होते. यासोबतच पालघर, वसई, मुंबई, गुजरात भागात वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर दिवसरात्र वाहतूक सुरू असते. वाढत्या वाहनांची संख्या पाहता या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम खाते आणि ठाणे महापालिकेच्या वतीने एकाच वेळी या मार्गावर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. या संस्थांमध्ये काम करताना मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव असल्याचे दिसत आहे. मार्गाच्या रुंदीकरणात दोन्ही बाजूचे सेवारस्ते मुख्य मार्गात विलीन केले जात आहेत. सेवारस्त्याचे काम काही वर्षांपूर्वीच केले होते; मात्र आता पुन्हा त्यांची तोडफोड करून त्यांचे विलीनकरण सुरू आहे. हे काम वाढवण्यात आल्याने मार्गाच्या कामात सुमारे ३०० कोटींची वाढ होणार असल्याचे दिसते.
रस्त्याच्या कडेला ठाणे महापालिकेने बांधलेले गटार तोडून पुन्हा नव्याने बांधले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वन विभागाच्या परवानग्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, परिणामी घाटाचे काम रखडले आहे. त्याचा फटका संपूर्ण घोडबंदर परिसराला बसत आहे. मार्गावरील विविध प्रकारच्या अडथळ्यांनी कोंडी होत असतानाच आता या रस्त्याला अनेक नव्या संकटांनी घेरले आहे.
८०० हून अधिक खड्डे
पावसामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत. एकट्या ठाणे घोडबंदर वाहिनीवर ८०० हून अधिक खड्डे आहेत. गेल्या वर्षी याच मार्गावर ४०० पेक्षा जास्त खड्डे होते, तर गेल्या वर्षी भरलेले खड्डे योग्य पद्धतीने भरलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे उंचवटे तयार झाले आहेत. पुलांवर असे उंचवटे निर्माण झाले असून, त्यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. सेवारस्ते उखडल्याने या ठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरले असून, वाहनांची वाहतूक मंदावली आहे.
वाहतूक विभागाची दमछाक
मार्गावरील नियोजनशून्य कामांचा फटका वाहतूक विभागाला बसत आहे. येथे होणारी कोंडी दूर करण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना १८-१८ तास रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. अनेकदा त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडत आहेत.
वडवलीकरांचा कोंडीशी सामना
कासारवडवली पुलाचे काम पूर्ण होऊन १५ दिवस उलटलेले असतानाही तो वाहतुकीसाठी वेळेत खुला केला नसल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. केवळ या पुलाच्या उद्घाटनासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे विनाकारण येथील लोकांना कोंडीचा सामना करावा लागला आहे.
व्यावसायिकांवर दुकान बंद करण्याची वेळ
सेवारस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांना वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या दुकानांसमोरून वाहनांच्या रांगा जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. १० वर्षांपूर्वी या व्यावसायिक सेवारस्त्याच्या रुंदीकरणासाठी आपली जागा देऊन काही फूट मागे गेले आहेत. आता पुन्हा त्यांच्यावर अशी वेळ आणली जात आहे.
प्रत्येक दिवशी १० किमी वाहनांची रांग :
मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे मार्गावरील कोंडी गायमुख घाटापासून मानपाडा-माजिवडापर्यंत आणि माजिवडापासून थेट गायमुख घाट, फाउंटन चौकापर्यंत पोहोचत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.