खड्ड्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

खड्ड्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

Published on

वसई, ता. ८ (बातमीदार) : सकाळच्या वेळी कामावर जाण्याची घाई, शाळेसाठी विद्यार्थ्यांची लगबग आणि रुग्णांना इस्पितळात घेऊन जाताना होणारी कसरत पावसाळ्यात पडलेले खड्डे पाहता दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे वसई-विरार शहरात रस्ते दुरुस्तीची मागणी होऊ लागली असून, महापालिका प्रशासन कार्यवाही केव्हा करणार, याकडे करदात्यांचे लक्ष लागले आहे.

वसई-विरार शहरात पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. विरार मार्ग ते महामार्गाकडे जाणारा रास्ता खड्डेमय झाला होता. त्यामुळे वाहनांची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने कोंडीचे विघ्न निर्माण झाले होते. महापालिकेच्या प्रभाग समिती फ पेल्हार क्षेत्रामध्ये येणाऱ्या वसई फाटा येथील हनुमान मंदिर ते महाराष्ट्र वजन काटा या ठिकाणचा रस्ता तत्काळ व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख यांनी केली आहे.

पावसाचे पाणी खड्ड्यांत साचत असल्याने ते वाहन चालवताना लक्षात येत नाही, तर ज्या ठिकाणी भले मोठे खड्डे आहेत, त्या मार्गाचा प्रवास असुरक्षित झाला आहे. रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या समस्येवर तातडीने लक्ष घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.

या ठिकाणी कोंडी
नायगाव शहर, माणिकपूर, निर्मळ भुईगाव मार्ग, सोपारा, संतोष भुवन, गास वसई मार्ग, तुळींज, आचोळे, सातिवली, अंबाडी पुलाजवळ, वालीव यासह औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग व अन्य परिसरात खड्डेमय प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच काही मार्गावर टाकलेली खडी बाहेर येऊ लागली आहे, तर खड्डे डोके वर काढू लागले आहेत. अशातच चालकांचा तोल गेला अथवा खड्डे चुकवताना दुर्लक्ष झाले, तर दुर्घटनेची भीती वाढली आहे.

वाहनांमध्ये बिघाड
वसई-विरार शहरात हजारो वाहने रोज धावत असतात, मात्र पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे वाहनात बिघाड होऊ लागला आहे. ब्रेक, क्लचसह इंजिन व अन्य वाहनांचे भाग नादुरुस्त होऊ लागले असून, दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

प्रवासी वाहतुकीला त्रास
प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बससह व अन्य वाहनांना रोजच खड्ड्यांचे दर्शन घडत आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखरूप नेता यावे, यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अपघाताची भीती
रस्त्यावरील खड्डे चुकवताना तोल जात असल्याने मोठा अडथळा निर्माण होत आहे. गाडी खड्ड्यात आपटली जात आहे. त्यामुळे चालकांना अपघात होण्याची भीती सतावू लागली आहे.

त्वरित कार्यवाही करणार!
पावसाळ्यात जे मार्ग नादुरुस्त झाले आहेत, त्याची वसई-विरार महापालिकेकडून पाहणी करून त्वरित खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रकाश साटम यांनी सांगितले.

विरार ते महामार्गाकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून महापालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- अभिजित सांगळे, वसई तालुका समन्वयक, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com