‘सकाळ’च्या पत्रकारितेचा इम्पॅक्ट भूमिपुत्रांचा आवाज सरकारपर्यंत!
भूमिपुत्रांचा आवाज सरकारपर्यंत!
दिवाचा पाहणी दौरा जाहीर; रेल्वे अतिक्रमणाचा मुद्दा पेटला
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सात वर्षांपासून रखडलेला दिवा उड्डाणपूल, बेकायदेशीर भूसंपादन, लाखो प्रवाशांची रोजची ससेहोलपट आणि स्थानिक भूमिपुत्रांचा दाबलेला आवाज यावर प्रकाश टाकणारी ‘सकाळ’ची विशेष वृत्तमालिका ‘दिव्यात समस्यांचा अंधार’ प्रशासनाला झोपेतून जागे करणारी ठरली. याप्रकरणी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या नगरविकास विभागाने तातडीची बैठक घेतली. याबाबत बुधवारी (ता. ९) दिवा परिसरात अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा तसेच भूमिपुत्रांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दिवा स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम २०१७ पासून रखडलेले असून, या पुलाच्या मार्गात येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन न करता प्रशासनाने थेट ताबा घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काहींना मोबदला मिळालेला नाही, तर काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने सुरू केलेल्या वृत्तमालिकेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून, दिवा स्थानक परिसरात वृत्तपत्राचे पोस्टर्स झळकावून आवाज उठवण्यात आला. या जनतेच्या दबावामुळे सोमवारी (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ठाणे महापालिका नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत अर्धवट पूल, बेकायदेशीर जमीन अधिग्रहण आणि न्यायालयीन आदेशांचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, दिवा स्थानकाच्या पश्चिमेकडील होम प्लॅटफॉर्मसाठी रेल्वेने भूमिपुत्र मंगेश भगत यांची जमीन अधिग्रहणाविना बळकावल्याचे पुढे आले. त्यामुळे पाहणी दौऱ्यात या अतिक्रमणावर अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांचे फलक
दिवा स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस, अर्धवट पुलाच्या पाया व रेल्वे फाटकाजवळ ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेतील बातम्यांचे फलक स्थानिकांकडून लावण्यात आले. ‘भूमिपुत्रांचा आवाज गप्प करता येणार नाही, भूमिपुत्रांचे शोषण, भूमिपुत्रांना मोबदला नाही, भूमिसंपादनाची प्रक्रिया’ असे अनेक मुद्दे उपस्थित करत फलक लावण्यात आले आहे.
‘एमआरव्हीसी’कडून अतिक्रमण
‘एमआरव्हीसी’सारख्या केंद्रीय संस्थांनीही या ठिकाणी अतिक्रमण केल्याची बाब समोर आली आहे. दिवा स्थानकाच्या पश्चिमेकडील होम प्लॅटफॉर्मसाठी भूमिपुत्र मंगेश भगत यांच्या जमिनीचा विनाअधिग्रहण ताबा घेण्यात आला. मोबदला, अधिसूचना किंवा संमती काहीही न देता जमिनीवर ताबा घेतला गेला आणि विरोध केला असता ‘गुन्हा दाखल करू’ अशी धमकी देण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.
प्रशासनाचा पाहणी दौरा
दिवा परिसरातील रखडलेले प्रकल्प, बेकायदेशीर भूसंपादन आणि अपूर्ण विकासकामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. ९) बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दिवा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. विशेषतः स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीचे अधिग्रहण, मोबदला आणि त्यांच्या न्यायाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.