बेकायदेशीर हॉटेल्स आणि ज्वलनशील साठ्यामुळे दुर्घटनेचे सावट
एपीएमसीवर दुर्घटनेचे सावट
बेकायदेशीर हॉटेल्स आणि ज्वलनशील साठ्यामुळे आग लागण्याची शक्यता
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः तुर्भे येथील ट्रक टर्मिनलच्या परिसरात आग लागण्याची दुर्घटना नुकतीच घडली होती, तर काही दिवसांपूर्वी ऐरोलीमध्ये खाद्यपदार्थाच्या गाडीवर सिलिंडरचा स्फोट होण्याची घटना घडली आहे. यामुळे एपीएमसी परिसरातील फळ मार्केटसमोरील ट्रक टर्मिनलमध्ये त्याचप्रमाणे भाजीपाला मार्केटमध्येदेखील बेकायदेशीर हॉटेल्स चालवले जात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडरचा साठा केला जात आहे. याचबरोबर ट्रकमधून उतरलेले पुठ्ठ्याचे गठ्ठे, प्लॅस्टिक कॅरेट आणि इतर ज्वलनशील वस्तू जागोजागी साठवून ठेवण्यात येतात. यामुळे भीषण आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फळ मार्केट येथील ट्रक टर्मिनलमध्ये दररोज शेकडो ट्रक ये-जा करतात. या ट्रकचालक व वाहकांसाठी तात्पुरती जेवणाची व्यवस्था म्हणून सुरुवात केलेल्या छोट्या स्टॉल्सनी आता मिनी हॉटेल्सचे रूप घेतले आहे. हा हॉटेल्स कुठलाही परवाना किंवा अग्निशमन सुरक्षा यंत्रणा न घेता बिनधास्त सुरू आहेत. गॅस सिलिंडर थेट रस्त्यावर ठेवलेले दिसून येतात. काही ठिकाणी एका जागी तीन ते चार सिलिंडरचा साठा दिसतो. पदपथावरदेखील बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विकण्यात येतात. हे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडे कोणत्याच प्रकारचा परवाना नसतो. फळ भाजीपाला मार्केटमधील पेंड्यावरसुद्धा बेकायदेशीरपणे अन्न शिजवण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येतो. यामुळेदेखील आग लागण्याची शक्यता आहे, तर फळ व भाजीपाला मार्केटमध्ये माल उतरवल्यानंतर रिकाम्या कॅरेट्स, पुठ्ठे व टोपल्या रस्त्यावरच पडून असतात. त्याचा नंतर अडगळीच्या जागेत ढीग लागतो. उघड्यावर शिजवले जाणारे अन्न, आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे जळणारे ढीग या सगळ्यांमुळे हा परिसर धोकादायक बनत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे विभाग आधिकारी सागर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.