फिल्मिस्तान स्टुडिओ विकल्याने कामगारांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

फिल्मिस्तान स्टुडिओ विकल्याने कामगारांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

Published on

फिल्मिस्तान स्टुडिओ विकल्याने कामगारांच्या भविष्यावर प्रश्न
राज्य सरकारच्या भूमिकेकडे सिनेसृष्टीचे लक्ष
मुंबई, ता. ८ ः चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आर. के. स्टुडिओ, कमल अमरोही स्टुडिओ, सिनेविस्टा स्टुडिओ, नटराज स्टुडिओ, मोहन स्टुडिओ तसेच फिल्मालय स्टुडिओ यांच्यापाठोपाठ आता फिल्मिस्तान स्टुडिओचीदेखील विक्री झाली आहे. त्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी तसेच कामगार यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोरेगाव पश्चिमेतील एस. व्ही. रोडवर आणि चार ते पाच एकर जमिनीवर वसलेला हा स्टुडिओ आर्केड डेव्हलपर्सने तब्बल १८३ कोटी रुपयांना विकत घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या ऐतिहासिक स्टुडिओवर आलिशान निवासी प्रकल्प उभा राहणार आहे. याची नोंदणी नुकतीच झाली असून, एका युगाचा इथे शेवट झाला, असे म्हणावे लागेल. १९४३ मध्ये शशधर मुखर्जी यांनी या स्टुडिओची स्थापना केली. तेथे चित्रित झालेला पहिलावहिला चित्रपट म्हणजे चल रे चल नवजवान. त्यानंतर दिल देखे देखो, नागीन, शबनम, अनारकली, तुमसा नही देखा, अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले. हा मुंबईतील सर्वात जुना चित्रपट स्टुडिओंपैकी एक मानला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार हा स्टुडिओ होता.
या स्टुडिओने अनेक कलाकार, दिग्दर्शक-निर्माते आणि तंत्रज्ञ घडविले. अनेकांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. हिंदीबरोबरच मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण येथे झाले, परंतु आता हा ऐतिहासिक स्टुडिओ काळाच्या पडद्याआड गेला आहे. येथे दोन ५० मजली टॉवरसह निवासी प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. हा प्रकल्प २०२६ मध्ये सादर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून, फिल्मिस्तान स्टुडिओची विक्री तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. या स्टुडिओमुळे लाखो चित्रपट कामगार, तंत्रज्ञ आणि कलाकारांचा उदरनिर्वाह चालतो, तसेच भारताच्या चित्रपट वारशाचे हे एक अनमोल प्रतीक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय राहणार, याकडे चित्रपटसृष्टीचे आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.

बेरोजगारीची कुऱ्हाड
या सर्व घडामोडींमध्ये येथील शेकडो कामगारांवर दुर्लक्ष झाले आहे. सेट्स उभारणारे कारागीर, लाइटमन, स्पॉटबॉय, टेक्निशियन, मेकअप आर्टिस्ट, ड्रायव्हर्स आणि इतर कामगारवर्गाचे भवितव्य आता अधांतरीत झाले आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी या स्टुडिओतून आपली उपजीविका केली, त्यांच्या हातून काम हिरावले गेले आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जमीनदोस्त होणे म्हणजे फक्त स्टुडिओचा अंत नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या आशा-आकांक्षांवरही पाणी फिरल्याचे पाहायला मिळाले.

ऐतिहासिक स्टुडिओ इतिहासजमा
चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्टुडिओंची विक्री याआधीही झाली आहे. चेंबूर येथे १९४८ मध्ये स्थापन झालेला आर. के. स्टुडिओ २०१९ मध्ये सुमारे २०० कोटी रुपयांना विकला गेला होता. त्याचप्रमाणे जोगेश्वरीतील कमल अमरोही स्टुडिओ १९५८ मध्ये उभारण्यात आला होता आणि २०१२ मध्ये त्याचीदेखील विक्री २०० कोटींना झाली. कांजूरमार्गमध्ये १९९५ मध्ये सुरू झालेल्या सिनेविस्टा स्टुडिओची २०२२ मध्ये ७८ कोटी रुपयांमध्ये विक्री करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com