अटल सेतूवरून डॉक्टरची आत्महत्या
अटल सेतूवरून डॉक्टरची आत्महत्या
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : जे. जे. रुग्णालयातील डॉ. ओंकार भगवत कवितके (वय ३२) यांनी सोमवारी (ता. ७) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले; मात्र अद्याप ओंकार यांचा शोध लागलेला नाही.
डॉ. ओंकार भगवत कवितके हे कळंबोली सेक्टर २० मधील अविनाश सोसायटीमध्ये राहत होते. जे. जे. रुग्णालयात सर्जन म्हणून गेल्या सहा वर्षांपासून ते कार्यरत होते. कवितके यांनी सोमवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला फोन करून जेवायला येतो, असा निरोप दिला. त्यानंतर ते कारने अटल सेतूवर गेले. या वेळी मुंबई मार्गिकेवर कार उभी करून खाडीमध्ये उडी घेतली. हा प्रकार येथून जाणाऱ्या एका वाहनचालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तत्काळ कंट्रोल रूमला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी डॉ. ओंकार यांची कार आणि त्यांचा फोन पोलिसांना आढळून आला. फोनवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी बचाव पथक तसेच सागरी सुरक्षा विभागाची ध्रुवतारा बोट, स्थानिक मच्छीमार यांच्या माध्यमातून शोधमोहीम हाती घेतली; मात्र डॉ. ओंकार यांचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती उलवे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
डॉ. ओंकार कवितके हे अविवाहित असून त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांनी कोणतीही चिठ्ठी सोडलेली नाही. अटल सेतूवरील नियंत्रण कक्षाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून डॉ. ओंकार यांच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रजाने यांनी केले आहे.