मराठी चित्रपट जगविण्यासाठी बंद असलेली सिंगल स्क्रीन सुरू होणे आवश्यक
मराठी चित्रपट जगविण्यासाठी बंद सिंगल स्क्रीन सुरू होणे आवश्यक
विविध मागण्यांबाबत राष्ट्रवादी चित्रपट विभागाने घेतली मंत्र्यांची भेट
मुंबई, ता. १० ः मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक चित्रपट विभागाच्या वतीने एका शिष्टमंडळाने सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची भेट घेतली. राज्यातील चित्रपटगृहांचे नूतनीकरण, पारंपरिक लोककलांचा विकास, चित्रनगरी प्रकल्प, चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या मागण्यांवर विचार करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन शेलारांनी दिले.
अनेक ठिकाणी जुनी व पडझड झालेली चित्रपटगृहे अजूनही कार्यरत आहेत. अशा चित्रपटगृहांचे तातडीने नूतनीकरण करून एकासाठी सुमारे १० लाख रुपये अनुदान मंजूर व्हावे, यासाठी शासनाने विशेष योजना आखावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग वगळून अन्य दिवशी मराठी चित्रपट कमी किमतीत दाखविण्यात यावेत. विशेषतः लहान नाट्यगृहांमध्ये मराठी नाट्य संस्थांना सवलती व बुकिंगमध्ये प्राधान्य द्यावे. पारंपरिक लोककलांचे जतन व विकास साधण्यासाठी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याची मागणीही या वेळी शिष्टमंडळाने केली. यासोबतच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे कृष्णा खोरे महामंडळाच्या जागेवर विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक उभारावे, असे सुचविले. नाशिकमधील दादासाहेब फाळके स्मारक रखडले असून यासाठी निधी आणि पुढाकार आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
या मागण्यांचा सकारात्मक विचार केला असून, लवकरच एक बैठक बोलावून निर्णय घेतले जातील, असे आश्वासन आशीष शेलार यांनी या वेळी दिले.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील, अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, तमाशासम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचा नातू मोहित नारायणगावकर, निर्माते नितीन धवणे आदी मंडळींचा समावेश होता.
इगतपुरीतील चित्रनगरी प्रकल्प
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इगतपुरी येथील प्रस्तावित चित्रनगरी प्रकल्प. यासाठी एकूण १२७ एकर जमीन उपलब्ध असून ती महसूल खात्याच्या मालकीची आहे. ही जमीन सांस्कृतिक खात्याच्या नावावर करून घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे स्थळ मुंबईपासून केवळ दोन ते अडीच तासांच्या अंतरावर आहे. आता गोरेगाव फिल्मसिटी संचालक मंडळाचा ठराव करून, फिल्मसिटीच्या तीनशे ते चारशे कोटींच्या ठेवींंपैकी १०० कोटींचा निधी या १२७ एकर जागेच्या विकासासाठी वापरावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.