महाडायलिसिस केंद्र रुग्णांना वरदान
मोखाडा, ता. ९ (बातमीदार) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागअंतर्गत पालघर जिल्हा शल्यचिकित्सक आणि एच.एल.एल. लाइफ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू झालेल्या महाडायलिसिस केंद्राला तीन महिने पूर्ण झाले आहेत. जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील सहा रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. नुकतेच येथे १००वे डायलिलिस यशस्वीपणे पार पडले आहे. येथील रुग्णांना काही महिन्यांपूर्वी नाशिक, सिल्व्हासा येथे उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे मोखाड्यातील हे केंद्र रुग्णांना वरदान ठरले आहे.
दोन महिन्यांपूर्वी जव्हारचे डायलिसिस सेंटर बंद झाल्यामुळे तिथल्या रुग्णांची झालेली अडचण मोखाड्यातील महाडायलिलिस केंद्रामुळे सुटली आहे. या केंद्रामध्ये राम लाड हे वरिष्ठ तंत्रज्ञ व राजेंद्र शिंगाडे हे कनिष्ठ तंत्रज्ञ कार्यरत आहेत. त्यांना अधिपरिचारक रोहित गोलवड व परिचर दीपक बरफ हे साह्य करत आहेत. किडनी विकारतज्ज्ञ डाॅ. अनुराग शुक्ला यांच्या ऑनलाइन सल्ल्यानुसार व ग्रामीण रुग्णालयातील तत्काळ विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक डायलिसिस पार पडते. प्रयोग शाळेतील चाचण्यासाठी जव्हारमधील हिंद लॅब आणि रक्तासाठी जव्हार कुटीर रुग्णालयातील रक्तपेढीचे साह्य घेतले जात आहे. एकीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि सुविधांचा अभाव असताना, अतिदुर्गम भागात किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध असलेली जीवनावश्यक आरोग्य सुविधा वरदान ठरली आहे.