हजारो कामगारांचा एल्गार
कासा, ता. ९ (बातमीदार) : देशातील कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि विशेष जनसुरक्षा विधेयक तत्काळ मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज (ता. ९) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विविध कामगार संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनंतरही कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत हजारो कामगारांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने संमत केलेल्या चार श्रमसंहिता लवकरच अमलात आणण्याची घोषणा केली आहे. या संहितांमुळे आजवर संघर्षातून मिळवलेले कामगारांचे हक्क आणि संरक्षण रद्द होणार आहे. त्यामुळे कामगारवर्गाचा जगण्याचा अधिकार धोक्यात येणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले. यासोबतच देशातील सार्वजनिक मालमत्ता खासगी कंपन्यांच्या हाती सोपवत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कामगार, शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन आवश्यक असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
विशेष जनसुरक्षा विधेयक हे विरोधकांना चिरडण्यासाठी आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, शिक्षक व प्राध्यापक संघटना, बँक व विमा कर्मचारी युनियन, कंत्राटी कामगार, फेरीवाले, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, विविध वाहनचालक, मजूर व शेतकरी अशा मोठ्या प्रमाणात विविध संघटनांनी सहभाग घेतला.
महामार्ग बंद
महामार्गावर जवळपास तासभर रास्ता रोको करण्यात आला, ज्यामुळे सुमारे चार ते पाच किमी अंतरावर दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोच्या वेळी दोनवेळा रुग्णवाहिका आली असता, तिला जागा मोकळी करून दिली गेली. तासभर रास्ता रोको करून महामार्ग मोकळा केला. अप्पर पोलिस अधिकारी विनायक नरले, कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी, तसेच डहाणू व तलासरी येथील पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारला इशारा देत सांगितले की, कामगारविरोधी व लोकशाहीविरोधी हे जुलमी कायदे मागे घेतले नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन उभे करावे लागेल. अनेक नेत्यांनी भाषणे करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.