पनवेलमध्ये उभारणार बहुउद्देशीय वाहनतळ

पनवेलमध्ये उभारणार बहुउद्देशीय वाहनतळ

Published on

पनवेलमध्ये उभारणार बहुउद्देशीय वाहनतळ
दोन वर्षांत प्रकल्‍प पूर्ण होणार; ५१० दुचाकी, ३४५ चारचाकींची व्यवस्था

पनवेल, ता. १० (बातमीदार)ः झपाट्याने विकसित होत असलेल्‍या पनवेलमध्ये वाहतूक कोंडीची समस्‍या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहनतळाअभावी अनेकजण वाहने रस्‍त्‍यावरच उभी करीत असल्‍याने कोंडीत आणखीच भर पडते. यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल महापालिकेने दोन बहुमजली वाहनतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. २३ हजार ७३७ चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे १० व १२ मजली वाहनतळ शहरात बांधण्यात येत आहे. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी दिली आहे.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पुढील बाजूस व प्रभाग कार्यालय ‘ड’ इमारतीजवळ अशा दोन ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येत आहेत. यासाठी प्रस्ताव सल्लागार म्हणून मे. डिझाईनो आर्किटेक्स अँड प्लॅनर्स या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.
सुमारे ७० कोटी ८५ लाख ५६ हजार ५६१ रुपये खर्चाचे हे १० मजली संकुल असेल. तळघर एक मध्ये २०७ दुचाकी, तळघर दोनमध्ये २९ चारचाकी, तळमजला १२ व्यावसायिक दुकाने, पहिला मजला १८ व्यावसायिक दुकाने, दुसरा ते सहावा मजला प्रति मजला २८ चारचाकीप्रमाणे १४० चारचाकी वाहने, तसेच सातवा मजला २६ चारचाकी वाहनांची क्षमता असेल. आठव्या व नवव्या मजल्यावर सभागृह असून, त्याची आसन क्षमता २८२ आहे. याखेरीस दहाव्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह ज्याची आसन क्षमता ५०० अशी आहे.
तर १२ मजली संकुलात तळघर क्रमांक एकमध्ये १२१ दुचाकी, तळघर क्रमांक दोनमध्ये १४२ दुचाकी, तळमजला व पहिला मजल्यावर अनुक्रमे ५९ व ५६ व्यावसायिक दुकाने, आठव्या मजल्‍यावर कार्यालयासाठी जागा, तिसरा ते बारावा मजल्‍यावर प्रति मजला चार दुचाकी व १५ चारचाकी वाहने उभी करण्याची व्यवस्‍था असेल. शिवाय मोठे टेरेस असेल.

बहुउद्देशीय व्यवस्था
वाहनतळाचा प्रकल्‍प साधारणतः १२१ कोटींचा आहे. दोन्ही वाहन संकुलामध्ये ५१० दुचाकी, तर ३४५ चारचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहन धुण्यासाठी वॉशिंग सेंटर असेल. संकुलातील व्यापाऱ्यांसाठी वाहनतळात आरक्षित जागा असेल. आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपली वाहने या ठिकाणी ठेवायची असल्यास मासिक व वार्षिक भाडेतत्त्वावर वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध असेल. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसोबत महापालिकेचे आर्थिक बळकटीकरण यातून होऊ शकते. व्यवसायासाठी १४५ दुकाने, आठ कार्यालयासाठी जागा, शिवाय बहुउद्देशीय सभागृह भाडेतत्त्‍वावर देऊन आर्थिक उन्नती साधता येईल.

पनवेल शहरात येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुक्तता करण्यासाठी दोन भव्य संकुले पनवेल पालिकेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. निश्चितच यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल. सर्वसाधारण सभेत वाहनतळाच्या प्रस्तावांना आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- मंगेश चितळे, आयुक्त पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com