बेरोजगारांना फसवणारे दलाल फोफावले!

बेरोजगारांना फसवणारे दलाल फोफावले!

Published on

बेरोजगारांना फसवणारे दलाल फोफावले!
मुलाच्या नोकरीसाठी आईने दिली आयुष्याची पुंजी; यंदा १५० हून अधिक प्रकरणे
 नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘‘मुलगा ३६ वर्षांचा झाला... पण नोकरी नाही, म्हणून लग्न जमत नाही… त्याचं एकटेपण पाहून जीव कळवळतो,’’ असं म्हणणाऱ्या रेखा कांबळे यांनी मुलाच्या भविष्याची आस धरली आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्या. मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याच्या प्रलोभनाने त्यांची ८.५ लाख रुपयांची फसवणूक झाली. नोकरी मिळेल, संसार बसेल या आशेने दिलेला प्रत्येक रुपया अखेर वाया गेला... असा प्रकार केवळ रेखा यांच्याबाबतीत घडलेला नाही. मुंबईत अशी नोकरीच्या नावाने फसवणुकीची तब्बल १५० प्रकरणे याच वर्षी नोंदवली गेली असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

 फसवणुकीची सुरुवात
कामोठे, नवी मुंबई येथे राहणाऱ्या रेखा कांबळे (वय ६५) या पती रमेश कांबळे यांच्या मृत्यूनंतर आपल्या मुलगा मयूर (वय ३६) याच्यासोबत राहतात. रमेश कांबळे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कार्यरत होते. निवृत्तीनंतर मिळालेली पेन्शनच आता आई आणि मुलाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. मयूर कांबळे हा कष्टाळू, जबाबदार आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम मुलगा असला, तरी स्थिर नोकरी नसल्याने त्याला स्थळं येऊनही वारंवार नकार मिळत होते. हे पाहून आई रेखा यांची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. जुलै २०२२ मध्ये रेखा व मयूर सिद्धिविनायक मंदिर दर्शनासाठी गेले असताना, त्यांच्या ओळखीचा एक नातलग नीलेश तांबे यांच्याशी भेट झाली. नीलेशने नोकरी लावून देणाऱ्या दोन व्यक्तींशी  ओळख करून दिली. त्यांनी १५ लाखांची मागणी केली, परंतु समोरच्यांची आर्थिक स्थिती पाहून १२ लाख ५० हजार रुपये इतक्या रकमेवर व्यवहार ठरला.

 नाटक आणि अखेर फसवणुकीची जाणीव
रेखा कांबळे यांनी पतीच्या सेवेनंतर मिळालेल्या निवृत्तिवेतनातून टप्प्याटप्प्याने पैसे देण्यास सुरुवात केली.  रेखा यांनी एकूण आठ लाख ५० हजार रुपये दिले. कधी कागदपत्रे, कधी वैद्यकीय तपासणी, तर कधी ‘छातीत डॉट आढळला’ या कारणाने पैसे मागितले गेले. केईएम रुग्णालयात नेऊन बनावट मेडिकल प्रक्रियाही दाखवली, पण नोकरी काही मिळाली नाही. 

अखेर तक्रार दाखल
आज तीन वर्षे उलटून गेली. नोकरी मिळाली नाही. पैसे गेले. मुलाचं लग्नही अजून अडकलेलं आहे. आणि आई अजूनही मुलाचं भविष्य उजळेल या आशेवर जगतेय, पण आता ती आशाही मावळत चाललीय.  शेवटी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रेखा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  फसवणूक करणाऱ्याविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

बेरोजगार तरुण आणि त्यांचं थांबलेलं आयुष्य
आजही अनेक मराठी घरांमध्ये हीच कहाणी सुरू आहे. मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, कष्टाळू आहे... पण नोकरी नाही. त्यामुळे स्थळं येतात, पण जातातही लगेच. मुलाच्या लग्नासाठी चिंतेत असणाऱ्या आई-वडिलांना मग ‘खास’ नोकरी मिळवून देतो म्हणणारे फसवे दलाल सापडतात. विश्वासात घेऊन त्यांचं सगळं आयुष्याचं साठवलेलं पैसे घेऊन पसार होतात. बेरोजगारीमुळे अडकलेले संसार, मोडलेली स्वप्नं आणि भरडली गेलेली आई-बापांची आशा. सरकारने नोकरीच्या नावाखाली चालणाऱ्या अशा फसवणूक टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मर्जी संघटनेकडून करण्यात आलेली.

अशी होते फसवणूक
-मुंबईत २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत १५० हून अधिक फसवणूक प्रकरणं नोंदली गेली, ज्यात बेरोजगार तरुणांना ‘सरकारी नोकरी’ देण्याच्या बहाण्याने फसवण्यात आले होते.
- काही प्रकरणांत तर ५ ते १० लाख रुपयेपर्यंतची रक्कम घेतली गेली.
- ‘पीटी केस’, क्लार्क, स्वच्छता कामगार, अग्निशमन दल यासारख्या पदांच्या नावाखाली फसवणूक केली जाते.
- आरोपींकडून बनावट कॉल लेटर, वैद्यकीय चाचण्या आणि अधिकृत कागदपत्रांची नक्कल दाखवून विश्वास संपादन केला जातो.

मी फक्त आई आहे… मुलाचं सुख पाहायचं होतं. त्याचं लग्न व्हावं, त्याचं आयुष्य मार्गी लागावं, यासाठी पतीच्या निधनानंतर मिळालेली पेन्शन, सगळं साठवलेलं दिलं, पण ना नोकरी मिळाली, ना संसार सुरू झाला. आता तरी सरकारने माझ्या मुलाला न्याय द्यावा. बस्स, मुलाचं आयुष्य थांबू नये.
- रेखा कांबळे

आईनं फक्त माझं भलं व्हावं म्हणून तिचं सगळं दिलं... माझी आई अशिक्षित, साधी आहे. म्हणूनच तिच्या भोळेपणाचा फायदा घेतला गेला. अशा फसवणुकीनं केवळ आमचे पैसे गेले नाहीत, आयुष्यच थांबलं. सरकारने कठोर पावले उचलावीत, जेणेकरून उद्याला दुसरी कुठलीही आई अशा जाळ्यात अडकू नये.
- मयूर कांबळे


टोळी कार्यरत
मुंबई महापालिकेत नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून गरजूंना लुटणारी एक टोळीच कार्यरत आहे. हे रॅकेट कोट्यवधींच्या व्यवहारात गुंतलेले आहे. मर्जी संघटनेकडे आलेल्या प्रकरणांपैकी एका तरुणाकडून १० लाख रुपये घेण्यात आले आणि तब्बल ११ महिने सफाई कामगार म्हणून मोफत काम करून घेतले गेले. त्याच्याकडे पालिका कर्मचाऱ्याचे खोटे ओळखपत्र, मेडिकलचे पत्र आणि नियुक्तिपत्रसुद्धा होते, अशी माहिती मर्जी संघटनेचे मंगेश सोनावणे यांनी दिली.

पालिकेतील नोकरीच्या प्रलोभनाने सुरू असलेल्‍या फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी मुंबई पोलिसांची मदत घेऊन एक विशेष टास्क फोर्स तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा झारीतील शुक्राचार्यांना तातडीने जेरबंद करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
- मंगेश सोनावणे,
प्रमुख, मर्जी संघटना, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com