मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

Published on

मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याप्रकरणी
कंत्राटदाराला १० लाखांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मेट्रो-३च्या वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात मे महिन्यात पावसाचे पाणी शिरल्याने वरळी-आचार्य अत्रे स्थानकादरम्यानची प्रवासी सेवा काही काळ बंद ठेवावी लागली होती. तसेच स्थानकातील अनेक साहित्यांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने कंत्राटदार कंपनी डोगस- सोमा जेव्ही यांना तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
मुंबईत २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनच्या कॉन्कोर्स लेव्हलमध्ये पाणी शिरले. स्थानकात जाण्यासाठी असलेल्या एंट्री-एक्झिटवर उभारलेली भिंत कोसळल्याने घडली होती. त्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्थानकातील प्लॅटफॉर्म, तिकीट खिडकीच्या समोरील जागा (कॉन्कोर्स) सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूमपर्यंत पोहोचले. तसेच स्टेशनवरील आर्किटेक्चरल डिझाइनचे नुकसानही झाले. यामुळे मेट्रो सेवा बंद ठेवावी लागली होती.
याबाबतच्या प्राथमिक चौकशीत या स्थानकातील पाणी काढण्यासाठी पंप (डिवाॅटरिंग यंत्रणा) बसवली होती; मात्र पाणी आत शिरत असताना ऑपरेटर ही यंत्रणा सुरू करण्यात अपयशी ठरला. पंप वेळेवर सुरू न झाल्यामुळे पाणी संपूर्ण स्टेशनमध्ये पसरले. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक राजेश कुमार मित्तल यांनी कंत्राटदार डोगस-सोमा जेव्हीला कारणे दाखवा नोटीस पाठवली. दोष निश्चित झाल्यानंतर १० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला; मात्र मेट्रोच्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com