म्हाडाकडून राज्यभर वृक्षारोपण मोहीम सुरू
म्हाडाकडून राज्यभर वृक्षारोपण मोहीम सुरू
दोन लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : जुलै महिन्यात साजरा होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने म्हाडाकडून राज्यभरात मुंबईसह सर्व विभागीय मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहिमेला बुधवारी (ता. ९) उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वावर गृहनिर्मिती करणाऱ्या म्हाडाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत दोन लाख झाडांची लागवड करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे.
म्हाडाकडून राबवल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई मंडळातर्फे ५० हजार, कोकण मंडळातर्फे २५ हजार झाडे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आवारात लावली जात आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या विभागीय मंडळांनी प्रत्येकी २५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. म्हाडाच्या सर्व प्रकल्पांमध्ये लावली जाणारी झाडे पर्यावरणपूरक असून, त्यांच्या निगा व देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्था आणि इतर संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन सुनिश्चित करण्यात येणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ आणि राह फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निमोण (चांदवड) येथील जैवविविधता उद्यानात १५ हजार झाडे लावण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कुंभारली येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्प परिसरात पुणे मंडळातर्फे ९,५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कोकण मंडळातर्फे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गृहनिर्माण पुनर्वसन प्रकल्प परिसरात ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. खोणी, शिरढोण, भंडार्ली, गोठेघर येथील प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली.
धाराशीव येथे १३ एकर जागेवर सर्वात मोठा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत २० जुलै रोजी धाराशीव येथील जेवळी गावी १५ हजार झाडे आठ एकर जागेवर लावण्यात येणार आहेत, तर कस्ती गावातील पाच एकर जागेवर पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत.
कांदळवन उभारण्याचे नियोजन
मुंबई मंडळातर्फे विक्रोळीतील कन्नमवार नगर, मालाडमधील मालवणी आणि गोरेगाव येथील प्रकल्पांमध्ये या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच समुद्रकिनारी पर्यावरणाचे संवर्धन करणारे कांदळवन उभारण्याचे नियोजनदेखील मंडळातर्फे करण्यात येत आहे.
वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही केवळ हरित आवरण वाढविण्याची मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी निरोगी व समृद्ध पर्यावरणाची शाश्वती देणारे पाऊल आहे. राज्याच्या विकास प्रवासात नवीन घरे उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पर्यावरणाचा समतोल राखणेही आवश्यक आहे. शहरांच्या विकासाबरोबर सावली देणारी झाडेही वाढली पाहिजेत.
-संजीव जयस्वाल
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.