कल्याण अवती-भवती
वन महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
कल्याण (वार्ताहर): देशभरात १ ते ७ जुलै या सप्ताहात वन महोत्सव साजरा केला जातो. १९५० पासून हा सप्ताह सुरू झाला आहे. या कालावधीत संपूर्ण देशात वृक्षारोपण करण्यात आले. कल्याण वन विभागअंतर्गत, दहागाव परिमंडळचे वनपाल मुरलीधर जागकर, वनरक्षक सुशांत निकम, मोहिनी शेळके, विशाल कंथारिया, सुहास पवार, निखिल कांबळे, संतोष पंडागळे, रेहान मोतीवाला या वन्यजीव मित्रांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच रायते गाव जिल्हा परिषद तथा शिक्षण समिती सदस्य हरेश पवार, मुख्याध्यापिका चारू बोंडे व इतर शिक्षक वृंद, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप टेंभे, मुख्याध्यापक मगर यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यचिन्ह, स्थानिक वन्यजीवांची ओळख आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व सांगितले. तसेच रायते शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून शाळेच्या आवारात वृक्षरोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
......................
आविष्कारच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची मदत
कल्याण (वार्ताहर) : आविष्कार एज्युकेशन फाउंडेशन प्रत्येक वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करते. खामघर, मुरबाड येथील असंख्य विद्यार्थी पावसाळ्यात शाळेत येतांना भिजत येतात अथवा गोणीची घोंगडी करून येत असतात. जास्त पाऊस असला की मग त्यांना सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य मिळावे, त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी यावर्षी आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन कल्याणच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा खामघर येथे १०० शालेय विद्यार्थ्यांना छत्री, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, चित्रकला वही, रंगपेटी, खाऊ यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात खामघरसह शेजारील तागवाडी, शिळंद, मानिवलीपाडा या शाळाही सहभागी झाल्या. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्या देण्यात आल्या. दलजीत बोन्स, प्रभाकर माळी, विनोद शेलकर यांनी शैक्षणिक साहित्यासाठी तर शंखेश्वरमधील अनिल शर्मा, मेहुल झुनझुनवाला, मिहिर काठे, मनीषा चौधरी यांनी छत्रीसाठी मदत केली. दिपाली काठे यांनी लहान मुलांसाठी खाऊ दिला.
..........................
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मार्गदर्शन बैठक
कल्याण (वार्ताहर) : पश्चिमेतील पाम रिसॉर्ट येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागाचे प्रभारी यु. बी. वेंकटेश यांनी कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विशेष बैठक घेतली. या बैठकीदरम्यान आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत चर्चा झाली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व नवचैतन्याची भावना जाणवली. या बैठकीचे आयोजन कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केले. या बैठकीत राजन भोसले, कल्याण, डोंबिवली प्रभारी ब्रिज दत्त, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनीदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी श्रीकृष्ण सांगळे, प्रदीप चौबे, गुरूगोविंदसिंग बच्चर, कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, मुन्ना तिवारी, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, शकील खान, ब्लॉक अध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.