थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

पोयनाड परिसरात गुरुपौर्णिमेचा उत्साह
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात गुरुवारी (१० जुलै) गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसून आला. गुरुपौर्णिमा आणि त्यातही गुरुवार हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने अनेकांनी सकाळपासूनच विविध ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेतले. पोयनाडजवळील बांधण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच नारंगी येथील श्रीमद गुरुपाद स्वामी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी भजन, कीर्तन आणि हरिपाठ, महाप्रसाद यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गुरुजनांना गुलाबाचे फूल भेट देऊन विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. यानिमित्त पोयनाड परिसरात विविध ठिकाणी सांगीतिक मैफलींचे तसेच गुरुपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गुरूविषयक महती सांगणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
.................
नारंगी येथे आपत्ती व्यवस्थापन शिबिराला प्रतिसाद
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत नारंगी यांच्या वतीने नुकतेच आपत्ती व्यवस्थापन शिबिर पार पडले. नारंगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ‍ डॉ. जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या वाढते शहरीकरण आणि नागरीकरण या पार्श्वभूमीवर अनेक दुर्घटना घडतात. या दुर्घटना टाळाव्यात आणि त्यासाठी आपण नागरिक म्हणून किती सजग असावे, यासाठी हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. एखादी आपत्तीची घटना घडली तर बचाव कसा करावा आणि आपली सुरक्षितता कशी राखावी, याबाबत विद्यार्थ्यांना सोबत घेऊन डॉ. जयपाल पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच नागरिकांनीदेखील आपत्ती किंवा एखादी दुर्घटना घडल्यास कोणकोणते उपाय करावेत याचीदेखील माहिती देण्यात आली. नारंगी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, सरपंच उदय म्हात्रे, ग्रामसेविका योगिता आचरेकर, मुख्याध्यपिका योजना म्हात्रे आदी उपस्थित होते.
.......................
पेणमधील कामगारांच्या देशव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण, ता. १० (वार्ताहर) : देशातील असंख्य कामगार संघटनांच्या माध्यमातून केंद्रीय कामगार संघटना आणि (आयटीयूसी) आयटक यांनी ९ जुलै रोजी विशेष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांकरिता कामगारांचा देशव्यापी संप घोषित केला होता. या संपाला पेण तालुक्यातील असंख्य कामगारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
देश आर्थिक महासत्ता बनत असल्याचा फसवा दावा एनडीए सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कामगार, शेतकरी, बेरोजगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताकडे अत्यंत असंवेदनशील व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता आयटकद्वारा आयोजित देशव्यापी संपाला संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा यांनी सक्रिय पाठिंबा दिला. एकीकडे केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून उद्योगपतींचे १६ लाख कोटी कर्जमाफी करते, मात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मालाला हमीभाव, दरमहा पेन्शन दिली जात नाही. अशा अनेक कामगारांच्या प्रलंबित मागण्या या देशव्यापी संपात उपस्थित करण्यात आल्या. तसेच या समस्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन अंमलबजावणी करणे, चतुर्थ श्रेणी कामगार व वाहनचालक भरतीवरील बंदी तत्काळ उठविणे, चार कामगार संहिता रद्द करणे, कंत्राटी रोजंदारीवरील कामगारांना नियमित करणे, केंद्रीय कामगारांप्रमाणे १ जानेवारी २०२५ पासून दोन टक्के महागाई भत्ता मंजूर करणे, अशा घोषणा या वेळी संपात देण्यात आल्या. या वेळी तहसील कार्यालय येथे आलेल्या मोर्चात सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी आदींचा सहभाग होता. त्‍याशिवाय अखिल भारतीय किसान सभेचे प्रा. गोरे, कामगार संघटना समितीचे विशाल साजेकर, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे, संदीप पाटील आदींनी यात सहभाग घेतला होता.
.............
महात्मा गांधी ग्रंथालयातर्फे आषाढी साजरी
पेण (बातमीदार) : महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयातर्फे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. संत सेवा मंडळ, पेणच्या संत सेवा वारकरी समाविष्ट असलेल्या दिंडीचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्ष सपना पाटील यांनी केले. या वेळी विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमांना हार घालून स्वागत केले. त्यानंतर दिंडीमध्ये संत साहित्याचे अभ्यासक व महात्मा गांधी स्मारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद वनगे, उपाध्यक्ष, कार्यवाह, सचिव, कर्मचारी तसेच वाचकवर्ग दिंडीत सामील झाला होता.
...........
अंगणवाडी सेविकांना गुणवत्ता विकास प्रशिक्षण
अलिबाग (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांसाठी दोनदिवसीय अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ८ व ९ जुलै रोजी अलिबाग तालुक्यात हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. या प्रशिक्षण वर्गात अंगणवाडी सेविकांना सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती विविध प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आली. हे प्रशिक्षण शिबिर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महिला व बालविकास विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले. प्रशिक्षणात ० ते ३, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासावर तसेच समाज आणि मातांचा बालविकास प्रक्रियेत सहभाग वाढवून अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. नवचेतना, आधारशिला आणि माता गट बांधणी व सक्षमीकरण हे तीन प्रमुख घटक प्रशिक्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या प्रशिक्षणात सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामधील सर्व बिटच्या पर्यवेक्षिका तसेच सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय त्यांच्यामार्फत उर्वरित सर्व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार अंगणवाडीतील बालकांचा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी मंगळवारी प्रशिक्षण शिबिरास भेट देत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे स्मिथिन ब्रीद तसेच जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सोमराज गिरडकर, शंकर पौळ, भोजराज क्षीरसागर यांनी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले.
.........................
श्रीवर्धन आगारप्रमुखांना उबाठाकडून प्रतीकात्मक पाना भेट
श्रीवर्धन (वार्ताहर) ः श्रीवर्धन आगारातील लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील फेऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत तक्रार करूनदेखील त्‍याकडे एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्‍मक गाडीचा पाना देऊन निषेध नोंदवत लक्ष केंद्रित केले.
श्रीवर्धन आगारातून मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा सुरू असते. श्रीवर्धन पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे स्‍थानिकांसह पर्यटकांची संख्या जास्‍त आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून एसटीचा वापर केला जातो. शिवाय स्‍थानिकांनादेखील एसटीशिवाय पर्याय नाही, मात्र आगार व्‍यवस्‍थापनाच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. श्रीवर्धन आगारातून मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती योग्यरीत्या होत नसल्याने अनेक गाड्या मार्गातच बंद पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे स्‍थानिकांसह पर्यटकांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. शिवाय रेडीएटरमधून धूर येणे, बटण पेट घेणे, चाकांचे नटबोल्ट सैल होणे, खिडक्यांना काचा नसणे, मुख्य दरवाजा दोरीने बांधलेला असणे, मोडकी आसने, गळक्‍या गाड्या इत्यादी कारणांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. त्‍यातच अनेक वेळा थांब्यांवरील प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा चालक गाडी थांबवत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्‍यामुळे एसटी महामंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी उद्धव बाळासाहेब गटातील पदाधिकाऱ्यांकडून आगारप्रमुखांना प्रतीकात्‍मक पाना भेट देण्यात आला. या वेळी गाड्यांची देखभाल-दुरुस्‍ती करून त्‍या मार्गस्‍थ कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com