माणकोलीतील अपहरणाचा छडा
वज्रेश्वरी, ता. १० (बातमीदार) : माणकोली-डोंबिवलीदरम्यान अपहरण झालेला शाळकरी मुलगा थेट नवी दिल्लीत बाजारपेठेत सापडला होता. मुलाच्या पालकांनी व्हॉट्सॲपवरून लोकेशन सापडल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर कपिल पाटील यांनी नवी दिल्ली येथील कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर तासाभरात हा मुलगा सापडला.
भिवंडी तालुक्यातील वेहळे येथील रुद्र भोईर माणकोली-डोंबिवली पुलाजवळील कॅफेमध्ये गेला. त्या ठिकाणावरून चौघांनी त्याला बोरिवली येथे नेले. बोरिवली येथून रुद्रला ते जनरल डब्याने नवी दिल्लीला घेऊन गेले. नवी दिल्लीच्या ट्रेनपर्यंतचा काहीसा घटनाक्रम रुद्रला आठवत आहे. त्यानंतर तो बाजारात कसा पोचला, याबाबतही त्याला काही आठवत नाही. रुद्र हरवल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे धाव घेऊन ठिकठिकाणी शोध सुरू केला. त्याचे वडील पंढरपूर येथे यात्रेला गेले होते. ते तातडीने घरी परतले, मात्र तीन दिवस मुलाचा शोध लागला नसल्याने ७ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचे व्हॉट्सॲप लोकेशन आढळले. नीलेश भोईर यांच्यासह नातेवाइकांनी तत्काळ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम माळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नवी दिल्लीतील पोलिसांमार्फत तातडीने शोध घेण्याची विनंती केली. अखेर पोलिसांच्या मदतीने नवी दिल्लीतील एका दुकानात रुद्र आढळला.
--------------------------
सतर्क राहण्याचे आवाहन
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तत्काळ हालचाली केल्यामुळे आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला, याबद्दल रुद्रचे वडील नीलेश भोईर यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले. तसेच कृतज्ञता व्यक्त केली. रुद्रप्रमाणे भविष्यात मुलांचे अपहरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलगा व पालकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे.