निम्म्याहून सीसीटीव्ही कॅमेरे बंद

निम्म्याहून सीसीटीव्ही कॅमेरे बंद

Published on

निम्म्याहून सीसीटीव्ही कॅमेरे बंद
टिटवाळ्यात नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिटवाळा शहरात बसवलेले निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे महिनाभरापासून बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही यंत्रणाच कुचकामी ठरल्याने चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

टिटवाळा पूर्वेकडील आंबेडकर चौक, बनेली, डीजी-१ चौक, एचएन बस स्थानक, इंदिरानगर आंबेडकर चौक, टिटवाळा जकात नाका, महागणपती रुग्णालय, एमएनएस चौक, न्यू तरे मार्केट, थारवानी चौक, निमकर नाका तसेच पश्चिमेकडील पंचवटी चौक, खंडू पाटील चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरील कॅमेरे बंद आहेत. ही बाब म्हणजे चोरांना आयते आमंत्रण देण्यासारखीच आहे, अशी टीका नागरिक करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या रिकाम्या घरांवर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांपासून ते रात्रीच्या वेळी दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांमुळे व्यापारी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी नुकताच इंदिरानगर येथील बौद्ध विहारात जनता दरबार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत आणि कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कुंभार उपस्थित होते. या वेळी कुंभार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत गुन्हेगारी नियंत्रणासाठी सीसीटीव्ही प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले आहे, तसेच व्यापाऱ्यांना तातडीने कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे.

अशी ही टोलवाटोलवी
सीसीटीव्ही बंद असल्याबाबत ठेकेदार विकास बागवे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कामामुळे केबल तुटल्याचे सांगितले. तसेच याबाबत महावितरणकडे तक्रार केल्याचे सांगितले. महापालिकेचे अभियंता भागवत यांना विचारणा केली असता, त्यांनी महावितरणचे फिल्ड इंजिनिअर जितेंद्र पाटील यांच्याकडे बोट दाखवत जनता दरबाराच्या बैठकीत असल्याचे कारण सांगत फोन ठेवून दिला. जितेंद्र पाटील यांना संपर्क केला असता त्यांनीही जबाबदारी झटकत सर्वस्वी स्मार्ट सिटीच हे काम बघते, असे सांगत आणखी एका अधिकाऱ्याचा नंबर दिला.

शेवटी स्मार्ट सिटी अंतर्गत कार्यरत वेंडरकडे असलेल्या सिद्धार्थ या प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटरला संपर्क केला असता त्यांनीही ‘पॉवर सप्लाय’चा मुद्दा असून, याबाबत महावितरणकडे तक्रार केल्याचे सांगितले. यानंतर महावितरणाचे अभियंता घोडविंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडे याबाबतची कोणतीच तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर पुन्हा सीसीटीव्हीच्या मेंटेनन्स विभागातील प्रमोद कांबळे यांच्याशी संपर्क केला असता सुरुवातीला कॅमेरे बंद असल्याची बाबच त्यांनी फेटाळून लावली. नंतर उलट फोन करणाऱ्या प्रतिनिधीलाच कोणकोणते कॅमेरे बंद आहेत याची यादी मागितली. हा सगळा प्रकार पालिकेच्या भोंगळ कारभाराची पोचपावतीच म्हणावी लागेल.

नागरिक चोरीच्या घटनांनी त्रस्त
पश्चिमेकडील मांडा आणि पूर्वेकडील इंदिरानगरचे नागरिक चोरीच्या घटनांनी त्रस्त आहेत. कल्याण तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांसह घरफोड्या, इमारतींचे बांधकाम साहित्य आणि सोन्याच्या दागिन्यांवरही चोरटे डल्ला मारत आहेत. या सर्व गोंधळातून एक गोष्ट स्पष्ट होते, की सीसीटीव्ही प्रणालीची देखभाल, जबाबदारी आणि नियंत्रण कुणाकडेच नाही. एकमेकांवर बोट दाखवण्याचा हा खेळ सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com