सागरी सुरक्षेसाठी २४ तास गस्त
सागरी सुरक्षेसाठी २४ तास गस्त
किनारी भागातील तीन हजारांहून अधिक कॉटेज, हॉटेल्सची तपासणी
अलिबाग ता. १० (वार्ताहर) ः दोन दिवसांपूर्वी घडलेल्या संशयित बोटीच्या प्रकारानंतर रायगड जिल्ह्याची सागरी सुरक्षा सक्षम करण्यावर जिल्हा पोलिस दलाने भर दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच सागरीकिनाऱ्यांवर २४ तास गस्त घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी असणाऱ्या तीन हजारांहून अधिक कॉटेज व हॉटेल्सची तपासण्यात आली आहे.
यापूर्वी मुंबईसह कोकणात समुद्रामार्गे अनेकदा दहशतवादी कारवाया झाल्या असल्याने सागरी सुरक्षेचे महत्त्व वाढले आहे. सागरी सुरक्षेसाठी नौदल, तटरक्षक दल जसे कार्यरत असते तशीच सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांवरही असते. सागरी सुरक्षेसाठी सागरी जिल्ह्याला गस्तीनौका पुरविण्यात आल्या आहेत. या गस्तीनौकांच्या माध्यमातून किनाऱ्यांवर देखरेख ठेवणे, समुद्रामार्गे होणारा परदेशी नागरिकांचा प्रवेश रोखणे, वस्तू किंवा शस्त्रांच्या तस्करीवर आळा घालणे अशी कामे केली जातात. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने खास सागरी पोलिस ठाण्यांची निर्मितीही करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात मांडवा, दादर आणि दिघी ही तीन सागरी पोलिस ठाणी कार्यरत आहेत.
दहशतवाद्यांचे मनसुबे उधळवून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. जे पोलिस अधिकारी, अंमलदार रजेवर गेले होते, त्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अलिबाग, मुरूड तालुक्यातील तटरक्षक दल आणि किनारी भागात शस्त्रधारी नाकाबंदी करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
मच्छीमारांसोबत संवाद साधून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागर सुरक्षा दल, ग्राम सुरक्षा दल आणि पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रायगड पोलिस दलाच्या चार बोटी असून, भाडेतत्त्वावर चार नौका गस्तीसाठी घेतल्या आहेत. या आठ बोटींवर मिळून आठ शस्त्रधारी पोलिस गस्त घालत आहेत, मात्र सध्या पावसाळा असल्याने बोटी बंद आहेत. मच्छीमारांच्या बोटींद्वारे सागरीकिनाऱ्यावरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सायबर सेलची नजर
सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रकार काही मंडळाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया सेल सुरू करण्यात आला आहे. सायबर सेल प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. ही यंत्रणाही २४ तास कार्यरत असणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व गाड्या तपासल्या जात आहेत. मुंबईहून मांडवा येथे बोटीने प्रवास करणाऱ्या जलवाहतूक प्रवाशांचीही तपासणी होत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे. प्रमुख बंदरांत चौक्या उभारण्यात येत आहेत. हे काम येत्या आठ दिवसांत होणार आहे. बोटीवर आम्हाला काही साहित्याची गरज आहे. ते साहित्य आणि सीसीटीव्हीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा नियोजनकडे पाठवणार आहोत.
- आंचल दलाल, पोलिस अधीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.