पाणी योजनेची रखडपट्टी
पाणी योजनेची रखडपट्टी
न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्पास विलंब; मंत्र्यांची कबुली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १०ः पनवेल, सिडको वसाहती आणि जेएनपीए परिसराचा पाणीप्रश्न सोडवणारी न्हावा-शेवा टप्पा क्रमांक ३ या योजनेचे काम रेंगाळले आहे. भूमी अधिग्रहण, बेकायदा बांधकामे, भूमिगत गॅसवाहिन्या, सरकारी कंपन्या आणि रेल्वे प्राधिकरणाकडून हव्या असणाऱ्या परवानग्या मिळवण्यात झालेला विलंब आदी कारणांमुळे या योजनेला उशीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कबुली दिली, मात्र या प्रकल्पाचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च २०२६ पर्यंत पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून सांगण्यात आले.
पनवेल महापालिका आणि तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. नागरीकरणाबरोबरच औद्योगिकीकरणालाही वेग प्राप्त झाला आहे. त्यासोबत परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे लॉजिस्टिक पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे डेटा केंद्र आदी महत्त्वाचे प्रकल्प येऊ घातले आहेत. होणाऱ्या बदलामुळे पूर्वी पनवेलपुरता मर्यादित असणारी रहिवासी संकुले आता पळस्पे, डेरवली, शेडूंग, ठोंबरेवाडी, बारवई, भोकरपाडा या गावांपर्यंत जाऊन पोहोचली आहेत. त्यामुळे आगामी काळात पनवेलची लोकसंख्या ३० ते ४० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांतर्फे वर्तवण्यात येत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात मजीप्रातर्फे योजनेचे काम करण्यात येत आहे.
२०२० ला सुरू झालेले काम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. योजनेचे काम पूर्ण होत नसल्याने पनवेल महापालिका आणि सिडको वसाहतींमधील रहिवाशांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याबाबत प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त केली. योजनेद्वारे तत्काळ पाणीपुरवठा सुरू करा, अशी मागणी त्यांनी सभागृहाला केली. त्यावर उत्तर देताना विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वाला उशीर होत असल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली. यावरून पनवेलकरांनी आणखी वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्रकल्पापुढे अडचणी
- २०२० ला न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ या योजनेला सुरुवात झाली.
- कोरोना काळात मशिनरी, मनुष्यबळ उपलब्धता व हालचालींवर बंधने आली.
- नियमांच्या मर्यादेमुळे निविदा कार्यादेशानंतर स्टील साहित्यांच्या दरात झालेली भाववाढ व त्यामुळे पाइपपुरवठा करण्यास कंत्राटदाराकडून विलंब झाल्याने काम रेंगाळले.
- पळस्पेफाटा ते भोकरपाडा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे
- लॉकडाऊनमुळे भू-संपादनाच्या कार्यवाहीस विलंब
- जागेचा मोबदला न मिळाल्याने जलवाहिन्या टाकण्यात संबंधित जागामालकांचा अडथळा
- रेल्वे, एक्स्प्रेस वे, टोल प्लाझा क्रॉसिंग आणि ओएनजीसी परिसरातून जलवाहिनी टाकण्यास ओएनजीसीने परवानगी नाकारणे
कंत्राटदाराला प्रतिदिन एक ते दीड लाखांचा दंड
पाणीपुरवठा टप्पा-३ या योजनेचे काम एमजेपीने में. जी.व्ही.पी.आर. इंजिनिअर्स हैदराबाद ठेकेदार यांना देण्यात आले, मात्र संबंधितांकडून नियोजनानुसार काम होत नसल्याने निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ठेकेदारावर प्रतिदिन दंडात्मक कारवाई सुरू आहे.
नव्या प्रकल्पांमुळे अडचणी
भोकरपाडा ते पनवेल आणि पनवेल ते कळंबोलीमार्गे तळोजा अशा ३२ किलो मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकणे, जुनी जलवाहिनी बदलणे आदी काम सुरू आहे, मात्र या जलवाहिनीच्या मार्गात अनेक नवीन प्रकल्प आले आहेत. उलवेजवळ सुरू असलेल्या नवीन विमानतळाच्या कामामुळे सभोवतालच्या परिसरात अनेक नवीन संस्था आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्यामार्फत सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पामुळे योजनेतून टाकण्यात आलेल्या पाइपलाइन पुन्हा इतरत्र स्थलांतरित करणे प्रकल्पाकरिता महागडे ठरत आहे.
कोणाला किती फायदा होणार
२०२० ला जेव्हा न्हावा-शेवा पाणीपुरवठा टप्पा-३ या योजनेचा शुभारंभ केला, तेव्हा या योजनेचा खर्च ४९३ कोटी इतका होता. प्रकल्पातून पनवेल महापालिकेला १०० एमएलडी, सिडकोला ६९ एमएलडी, जेएनपीएला ४० एमएलडी, एमएमआरडीएला २० एमएलडी इतका पाणीपुरवठा होणार आहे. त्याबदल्यात संबंधित संस्थांनी आपल्या वाट्याला येणारे अर्थसहाय्य केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.