शहापूरच्या घटनेचे विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले पडसाद

शहापूरच्या घटनेचे विधानसभेच्या अधिवेशनातही उमटले पडसाद

Published on

शहापूर घटनेचे अधिवेशनातही पडसाद
सावित्रीच्या लेकींचा छळ अजूनही सुरूच : नाना पटोले
शहापूर, ता. १० (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील सावरोली गावाजवळच्या आर. एस. दमानी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा मासिक धर्म तपासण्याच्या उघडकीस आलेल्या घृणास्पद प्रकरणाचे पडसाद गुरुवारी (ता. १०) विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनातही उमटले. आमदार नाना पटोले व जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. नाना पटोले यांनी अजून सावित्रीच्या लेकींचा छळ सुरूच आहे, असे म्हटले. तर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात सांगितले.
याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी (ता.१०) दुपारी शहापूर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी चाकणकर यांनी सांगितले, की या गुन्ह्यातील दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करू. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली करू. दरम्यान, या शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पावले उचलण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला दिल्याचे त्या म्हणाल्या.

शाळांमध्ये शिक्षक-पालकांच्या बैठकांचे निर्देश
चाकणकर यांनी पुढे सांगितले, की विद्यार्थिनींच्या मनात या घटनेनंतर भीती आहे. तसाच संभ्रमदेखील आहे. त्यासाठी या मुलींचे समुपदेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षक व पालकांच्या बैठका घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर बुधवारी दिवसभर पोलिस संस्थेच्या संचालकांना माहिती देण्यासाठी वारंवार फोन करीत होते, परंतु संस्थेचे संचालक पुढे आले नाहीत अथवा त्यांनी प्रतिसादही दिला नाही, याबद्दल चाकणकर यांनी संताप व्यक्त केला.

या गंभीर प्रकरणात बुधवारी मुख्याध्यापिका आणि शिपाई अशा दोन महिलांना अटक करण्यात आली. गुरुवारी आणखी तीन महिलांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आता एकूण पाच जणांना अटक झाली असून, तिघे जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी (ता. ८) शाळेत मुलींच्या प्रसाधनगृहाच्या भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर विद्यार्थिनींचा मासिक धर्म तपासण्यासाठी त्यांना विवस्त्र करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला होता. तसेच मुलींच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याची तक्रारही पालकांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ९) पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यासाठी पालकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर अखेर पोक्सो कायद्यांतर्गत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रसाधनगृहात पाण्याचा अभाव
उघडकीस आलेल्या या घटनेनंतर शाळेच्या प्रसाधनगृहात पाण्याचा अभाव असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पाण्याच्या अभावामुळेच भिंतीवर तसेच लादीवर रक्ताचे डाग आढळून आल्याचे पालकांनीदेखील सांगितले. शाळेत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सती सावित्री समिती स्थापन करण्यात आली नाही. पालक समितीदेखील स्थापन नसल्याने शिक्षक व पालकांच्या मासिक बैठका घेतल्या जात नव्हत्या. सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत इतर समित्याही स्थापन करण्यात आल्या नसल्याचे आता उघडकीस आले आहे.

बाईच्या बाईपणाचा बाजार मांडलात का? : आमदार चित्रा वाघ
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत ‘बाईच्या बाईपणाचा बाजार मांडलात का?’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, की मुलींच्या आत्मसन्मानाला काळिमा फासणारी ही घटना आहे. शाळा ही सुरक्षित जागा असायला हवी, पण इथे तर मुलींना अपमानाचा घोट प्यायला लावला जातोय. पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हा लाजेचा नाही की शिक्षा करण्याचा विषय नाही. शाळेतील शिक्षकांनी जर असे कृत्य केले असेल, तर त्यांनी आधी आपल्या घरातल्या मुलीकडे पाहावे. त्यांचेही बाईपण असते ना? आम्ही ही घटना हलक्यात घेणार नाही. शाळा म्हणजे ज्ञानमंदिर असते. तिथे जर असा अपमान होत असेल तर ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची हार आहे. आम्ही मुलींच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारणारच, असा इशारा वाघ यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com