‘कर्नाक’चे नामकरण ‘सिंदूर उड्डाणपूल’
‘कर्नाक’चे नामकरण ‘सिंदूर उड्डाणपूल’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः ‘‘मुंबई महानगरपालिकेने दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशा सिंदूर उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले आहे. रेल्वे मार्गावरील या पुलाच्या उभारणीचे काम आव्हानात्मक असूनदेखील अनेक अडथळ्यांवर मात करीत ते यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले,’’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या पुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि मशीद बंदर रेल्वेस्थानक यांच्यादरम्यान असलेल्या कर्नाक पुलाच्या लोकार्पणाप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य प्रतोद मनीषा कायंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा पूल अनेक वर्षे ‘कर्नाक पूल’ या नावाने ओळखला जात होता. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव पुलाला देण्यात आले होते, परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप लादण्यात आले. त्यामुळे अशा काळ्या इतिहासाशी संबंधित नामकरण हटविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यानुसार, हा पूल जुन्या नावाऐवजी यापुढे ‘सिंदूर उड्डाणपूल’ या नव्या नावाने ओळखला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
...
पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि’मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
- सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीमुळे अनेक वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक आता सुलभ होणार.
- सिंदूर पूल कार्यान्वित झाल्यावर पी. डि’मेलो मार्ग व पुढे शहीद भगतसिंग मार्गावरील विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेद बिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.
- सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीने युसूफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार.
...
पुलाचे आकारमान
- संपूर्ण पूल प्रकल्पाची लांबी ३४२ मीटर
- लोहमार्गावरील पूल : आर.सी.सी. आधारस्तंभांवर (पीअर) प्रत्येकी ५०७ मेट्रिक टन वजनाचे ७० मीटर लांब व २६.५० मीटर रुंद व १०.८ मीटर उंच असे दोन गर्डर.
- महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्यांची लांबी २३० मीटर (पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर)
...
ठळक वैशिष्ट्ये
- प्रकल्पाला एकूण ९८ कोटी रुपये खर्च
- एकूण प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण
- पोहोच रस्त्याचे काम १२ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित असताना संपूर्ण पोहोच रस्त्याचे काम प्रत्यक्षात सात महिन्यांत पूर्ण
- पूर्वेकडील संपूर्ण काम पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंत अवघ्या चार महिन्यांत पूर्ण
- हे काम कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते; पण महानगरपालिकेने ते यशस्वीपणे पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.