पोषण आहारातून कंत्राटदारांचे पोषण

पोषण आहारातून कंत्राटदारांचे पोषण

Published on

पोषण आहारातून कंत्राटदारांचे पोषण
अंगणवाडीतील निकृष्ट पदार्थांकडे पालकांची पाठ
नवीन पनवेल, ता. १० (बातमीदार) ः राज्य सरकारचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये गर्भवती माता आणि लहान मुलांसाठी पोषण आहार दिला जातो; मात्र त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने त्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारांच्या पाकिटांचा ढीग साचला आहे. पोषण आहाराच्या दर्जाबाबत कुठेही अवाक्षर काढायचे नाही, असा सज्जड दम पर्यवेक्षकांकडून दिला जात असल्याने या योजनेतून केवळ कंत्राटदारांचेच पोषण होत असल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये उघडकीस आला आहे.
लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून अंगणवाडीतून पोषण आहार दिला जातो. शहरी भागात महिला बचत गटांना याबाबतचे कंत्राट दिले आहे, तर ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका हा आहार शिजवतात. बचत गटाच्या आहारात काही दिवसांपूर्वी किडे आढळल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला होता. शिवाय, हा आहार बेचव असल्याने तो मुले फेकून देत असल्याचे पालकांनी सांगितले.
सहा महिने ते तीनवर्षीय बालक, गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी पूर्वी गहू, चणे, साखर, मूगडाळ आदी वस्तू पोषण आहार स्वरूपात दिला जात होता; मात्र त्यात बदल करून वर्षभरापासून ‘रेडी टू इट’ म्हणजेच शिजवण्यास तयार असलेले पदार्थांची पाकिटे उपलब्ध करून दिली जातात. पाकिटातील पदार्थांत कोमट पाणी टाकल्यास, दोन ते तीन मिनिटांत तो शिजतो; मात्र या पदार्थांचा दर्जा आणि चव निकृष्ट असल्याने तो कोणीही घेऊन जात नाही. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर आहार मिळाल्याच्या पालकांकडून सह्या घेऊन सोपस्कार पार पाडण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून अंगणवाडी सेविकांना दिले जाते. दरम्यान, नवीन पनवेलसह ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये वाटपासाठी आलेला पोषण आहार घेतला जात नसल्याने तो तसाच पडून असल्याचे आढळले आहे.
---
आहाराचे पाकीट उघडताच घाण वास येतो. त्यात मुंग्या असतात. पूर्वी निदान गहू, कडधान्ये मिळायचे, ते वापरले तरी जायचे. आताचा पोषण आहार घरी आणून फेकण्यापेक्षा तो न आणलेलाच बरा.
- सपना चेतन पाटील, लाभार्थी
---
मुलांना मिळणारे पदार्थ अतिशय बेचव असतात. अशा प्रकारचा पोषक आहार खाऊन मुले सुदृढ होण्याऐवजी आजारी पडण्याची भीती आहे.
- ज्योती बने, पालक
---
बचत गटाकडून पुरवल्या जाणाऱ्या आहाराबाबत अद्याप तक्रार आली नाही. तक्रार आल्यास माहिती घेतली जाईल. विभागाकडून नेहमीच दर्जेदार पोषण आहार देण्याचा प्रयत्न असतो.
- सुहिता वाव्हळ, बालविकास प्रकल्प अधिकारी, पनवेल शहर
---
पोषण आहाराच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास नक्कीच दखल घेतली जाईल. या आहारात भरपूर पोषणमूल्ये असून, याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे.
- प्रविण पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पनवेल ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com